नागपूर : शहरात चोहोबाजूंनी सिमेंट रस्ते आणि उड्डाणपुलांचे जाळे विस्तारले जात आहे. मात्र प्रत्यक्षात अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढतच आहे. शहर आणि परिसरात २०२० ते २०२५ या पाच वर्षांत ५४१७ प्राणांतिक अपघातांची नोंद झाली. यात दीड हजारावर लोक ठार झाले. यातील सर्वाधिक अपघात २०२४ मधील आहेत. २०२४ मध्ये एकूण १५५५ अपघात घडले. यात तब्बल ३४५ जणांना जीव गमवावा लागला. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, या अपघातांमध्ये ज्यांचा अकाली मृत्यू ओढवला ते २९२ जण हे घरातील कमावते होते. २०२४ मध्ये जे १२५५ प्राणांतिक अपघात घडले यात गंभीर स्वरूपाची इजा झालेल्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे १२८१ आहे.
गेल्या ५ वर्षांच्या काळात झालेल्या अन्य अपघातांमध्ये ५४२६ जणांना गंभीर स्वरूपाच्या दुखापतींचा सामना करावा लागला. अपघातमुक्त शहराचे स्वप्न दाखवत कोट्यवधींची धूळधाण करणारे शासन, प्रशासन, वाहतूक पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था कितीही आपली पाठ थोपटून घेत असले तरी वास्तव वेगळे आहे.
‘ब्लॅक स्पॉट’ नियोजनाचे काय?
न्यायालयाने खडसावल्यानंतर विविध विभागांनी शहर आणि परिसरातील २३ अपघात प्रवण( ब्लॅक स्पॉट) स्थळांची यादी प्रसिद्ध केली. तरीही चालू वर्षात म्हणजे १ जानेवारी ते २० जून २०२५ या कालावधीत १० झोनमध्ये झालेल्या अपघातांत १४९ जण दगावले. २३९ गंभीर जखमी झाले. यात एकट्या जून महिन्यात शहराच्या हद्दीत १३ अपघात घडले. यात १५ जणांनी जीव गमावला.
‘तांत्रिक चुका कारणीभूत’
मेन होल उघडे असणे, खड्डे या तांत्रिक चुका बहुतांश जीवघेण्या अपघातामागे कारणीभूत असतात. घटना घडून गेल्यावरही त्याचे उत्तरदायित्व स्वीकारले जात नाही. त्यासाठी जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे, असे रस्ता सुरक्षा समितीचे कार्याध्यक्ष डॉ. विकास महात्मे यांनी म्हटले आहे.
‘पोलिसांकडून कागदपत्रांवरच भर’
अपघात टाळण्यासाठी पोलीस कागदपत्रांवरच भर देतात. यातून मानवी चुका टाळल्या जात नाहीत. चुका करणाऱ्यांचे काटेकोर अंकेक्षण होऊन वाहतूक नियम पाळले जाणे आवश्यक आहे, असे रोडमार्क फाऊंडेशनचे राजेश वाघ यांनी सांगितले.
‘वाहतूक शाखेला विश्वासात घेतले जात नाही’
पायाभूत सुविधा उभारत असताना अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्था आणि बांधकाम विभागाकडून वाहतूक शाखेला विश्वासात घेतले जात नाही. या शिवाय वाहतूक शाखेने सुचवलेल्या बदलांवरही उत्तर दिले जात नाही. रस्त्यावर खोदकाम करीत असतानाही कंत्राटदार सुरक्षा नियम पाळत नाहीत. यातून तांत्रिक चुका राहतात आणि अपघाताला आमंत्रण मिळते, अशी खंत वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त माधुरी बाविस्कर यांनी बोलून दाखवली.