नागपूर : जरिपटका येथील धान्य व्यापारी राजू उर्फ राजेंद्र दिपानी यांच्यावर गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास गोळीबार करीत ५० लाखांची रोकड लुटणारे आरोपी ७२ तासांनंतरही मोकाट आहेत. ज्या ठिकाणी दिपानी यांच्यावर हल्ला झाला त्या परिसरातले स्मार्ट सिटी प्रकल्पातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे खासगी सीसीटीव्हींचे तार जुळवत हल्लेखोरांचा माग काढताना पोलिसांची प्रचंड दमछाक होत आहे.

हल्लेखोरांनी गोळीबारासाठी ज्या दुचाकीचा वापर केला होता, ती दुचाकी चोरीची असल्याचे प्राथमिक तपासून समोर आले आहे. पोलिसांचा तपास या पुढे सरकलेला नाही. शिवाय गोळीबार करणारे हल्लेखोर हे चेहऱ्याला मास्क लावून आले होते. त्यामुळे परिसरातील खासगी सीसीटीव्हीवरूनही त्यांचा माग काढताना पोलिसांची दमछाक होत आहे.

दिपानी यांच्या दुकानातील कर्मचाऱ्यांचीही पोलिसांनी चौकशी करून झाली आहे. त्यांच्याकडूनही कुठलाच सुगावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दिपानी यांच्याकडून लुटलेली ५० लाखांची रोकड मोठी असल्याने ओळखीतल्याच कोणीतरी खात्रीलायक टीप हल्लेखोरांना पोचवल्याचाही पोलिसांना संशय आहे.

हल्लेखोर स्थानिक की भाडोत्री गुंड

ज्या पद्धतीने दिपानी यांच्यावर गोळीबार झाला ते एकट्या – दुकट्याचे काम नाही. या मागे एखाद्या टोळीचा देखील हात असण्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत. दिपानी हे रोकड घेऊन कधी निघणार, कुठल्या मार्गाने जाणार, ते कुठे एकटे सापडणार या सगळ्यांची इत्यंभूत माहिती हल्लेखोरांना दिली गेली असावी. याची रेकीही करण्यात आलेली असावी, असाही पोलिसांना संशय आहे. अतिशय नियोजनबद्धरित्या कट रचून ही लूट झाल्याचे प्राथमिक तपासातून आढळत आहे. त्यात घटना घडून ७२ तास लोटून गेले तरी हल्लेखोरांचा कसलाही सुगावा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे या मागे स्थानिक टोळी आहे, की सुपारी देऊन परराज्यातील भाडोत्री गुंडाकडून हा हल्ला करवून घेत इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड लुटली गेली, याचेही कोडे निर्माण झाले आहे.