मुंबई, मराठवाडय़ात कार्यशाळांचा अभाव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई आणि मराठवाडा विभागातील कारागृहांमध्ये कार्यशाळांचा अभाव असल्यामुळे विदर्भातील नागपूर आणि अमरावती मध्यवर्ती कारागृहांमध्ये दिवसेंदिवस कैद्यांची गर्दी वाढतच आहे. या कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांना डांबण्यात आल्याने तेथील व्यवस्था पुरती कोलमडली आहे.
महाराष्ट्रात येरवडा, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, ऑर्थर रोड, तळोजा आणि ठाणे येथे मध्यवर्ती कारागृहे आहेत. यापैकी, ऑर्थर रोड, तळोजा, ठाणे, येरवडा, नागपूर आणि नाशिक मध्यवर्ती कारागृहांची क्षमता इतर मध्यवर्ती कारागृहांच्या तुलनेत मोठी अधिक आहे. परंतु मुंबई विभागातील ठाणे मध्यवर्ती कारागृह वगळता आर्थर रोड आणि तळोजा कारागृहात सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कैद्यांसाठी कार्यशाळाच निर्माण करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे या कारागृहांमध्ये केवळ न्यायाधीन कैदी (कच्चे कैदी) ठेवण्यात येतात. तर कोकण आणि मुंबई परिसरातील शिक्षा झालेल्या कैद्यांना नाशिक, येरवडा, नागपूर आणि अमरावती कारागृहांमध्ये वर्ग करण्यात येते. मराठवाडय़ातही हीच परिस्थिती आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद येथे मध्यवर्ती कारागृह असून त्या ठिकाणी सक्तमजुरीच्या कैद्यांसाठी कारखाने आहेत. परंतु औरंगाबाद कारागृहाची क्षमता अतिशय कमी असल्याने जालना, लातूर, उस्मानाबाद, बिड, परभणी या जिल्ह्यातील शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कैद्यांना औरंगाबाद आणि इतरत्र स्थलांतरित करण्यात येते.
कैद्यांच्या स्थलांतरामुळे येरवडा, नाशिक, नागपूर आणि अमरावती कारागृहात कैद्यांची गर्दी झाली आहे. नागपूर कारागृहाची क्षमता १ हजार ८४० कैद्यांची असून आजघडीला २ हजार २३९ कैदी तेथे डांबण्यात आले आहेत. तर अमरावती मध्यवर्ती कारागृहाची क्षमता ७०० कैद्यांची असून १ हजार ९० कैदी त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. २ हजार ६९५ कैद्यांची क्षमता असलेल्या नाशिक कारागृहात ३ हजार ११८ कैद्यांना डांबण्यात आले आहे. क्षमतेपेक्षा अधिक कैदी ठेवण्यात आल्याने या कारागृहांमधील नागरी सुविधा आणि इतर व्यवस्था पुरती कोलमडली आहे. या कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या अधिक असल्याने कारखाने असतानाही प्रत्येक सक्तमजुरीच्या कैद्याला काम देता येत नसल्याची माहितीही समोर येत आहे. त्यासंदर्भात कारागृह विभागाला अनेकदा निवेदन देऊनही कोणतेही उपाय योजण्यात येत नसल्याची ओरड स्थानिक प्रशासनाकडून होत आहे. विशेष म्हणजे, तळोजा आणि लातूर कारागृहात कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या असतानाही तेथील कार्यशाळा सुरू करण्यात आली नाहीत. कारागृह विभागाच्या उदासीन धोरणामुळे मुंबई, कोकण आणि मराठवाडय़ातील कैद्यांना इतरत्र स्थलांतरित करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.
मुलाखत, भेटीसाठी मनस्ताप
मुंबई, कोकण आणि मराठवाडय़ातील कैद्यांना इतरत्र स्थलांतरित करण्यात येत असल्याने त्यांच्या नातेवाईकांना शेकडो किलोमीटरचे अंतर ओलांडून कैद्याची भेट घ्यावी लागते. त्यामुळे नागरिकांना अनेक अचडणींचा सामना करावा लागतो. परिणामी कैद्यांचा त्यांच्या परिवारापासून संपर्क तुटत असल्याचे आरोपही कैदी करीत आहेत.
तळोजामध्ये कार्यशाळा प्रस्तावित
मुंबई परिसरातील गुन्हेगारांना शिक्षा झाल्यानंतर त्यांना मुंबई आणि परिसरातील कारागृहात ठेवण्यासाठी कारागृह प्रशासन प्रयत्नरत आहे. त्यादृष्टीने तळोजा कारागृहात कार्यशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव असून लवकरच त्याला गती मिळेल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur amravati prisoners crowded jails
First published on: 21-11-2015 at 02:19 IST