नागपूर: सर्व प्रवाशांना स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुखद प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी कटिबद्ध असलेल्या महा-मेट्रो नागपूरने मेट्रो परिसरात तसेच मेट्रो गाड्यांमध्ये गुटखा, पानमसाला इत्यादी तंबाखूजन्य पदार्थांचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे.

अशा पदार्थांच्या सेवनामुळे अनेकदा थुंकणे व कचरा पसरवणे यासारख्या घटना घडतात, ज्यामुळे मेट्रो परिसरातील स्वच्छतेवर परिणाम होतो आणि इतर प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. या समस्येवर उपाय म्हणून नागपूर मेट्रोने जनजागृती मोहिमा व गस्त वाढविली आहे. आजपर्यंत अशा स्वच्छता व आरोग्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २२५ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून रु. १.१२ लाख इतका दंड वसूल करण्यात आला आहे. हे पदार्थ मेटल डिटेक्टरने ओळखता येत नसल्याने स्थानकांवर अचानक तपासण्या करण्यात येतात.

सुरक्षा रक्षकांना यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले असून, नियम तोडणाऱ्यांची ओळख करून त्वरित कारवाई करण्यासाठी सेंट्रल सर्व्हेलन्स सिस्टीमच्या माध्यमातून प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते आणि गरज पडल्यास कार्यरत पथकांना त्वरित सूचना दिल्या जातात. कायदेशीर कारवाईबरोबरच, महा-मेट्रोने तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक धोख्यांबाबत जनजागृती करण्यासाठीही विविध मोहिम राबवल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामध्ये मुखाचा कर्करोग, अस्वच्छता व सार्वजनिक गैरसोय यासारख्या गंभीर दुष्परिणामांचा समावेश आहे. महा-मेट्रो नागपूर सर्व प्रवाशांना आवाहन करते की त्यांनी मेट्रो प्रवास जलद आणि सोयीस्कर बनवतानाच तो सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महामट्रोने केले आहे.