नागपूर : यशोधरा नगर पोलीस हद्दीत शनिवारी भर दुपारी झालेल्या भाजपाचे वॉर्ड अध्यक्ष सचिन साहू यांच्या खून प्रकरणाचे रविवारी कांजी हाऊस चौकात संतप्त पडसाद उमटले. साहू यांच्याकडे परिसरातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांसंदर्भात तक्रारी आल्या होत्या. यावरून त्यांनी कारवाईसाठी वारंवार आवाज उठवल्यानेच गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांचा खून करत आवाज दाबल्याचा संताप व्यक्त करत पारडी मार्गावर नागरिकांनी रविवारी चक्काजाम केला.
भाजपचे उत्तर नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष सचिन साहू यांचा शनिवारी भरदिवसा धारदार शस्त्राने खून झाला. जुन्या पैशाच्या वादातून चौघांनी हा खून केल्याचे परिसरातील सीसीटीव्हीतही दिसले. त्यानंतर पोलिसांनी रात्री दोन मारेकऱ्यांना अटक केली. आणखी दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. या खुनामुळे परिसरातील नागरिक आणि काही भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी केली.
आरोपीला जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाहीत, असे सांगून कार्यकर्त्यांनी रस्ता रोखून धरला. नागरिकांनी केलेल्या या चक्काजामची माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त निकेतन कदम आणि भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी घटनास्थळ गाठत कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यांनी आंदोलनस्थळावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना या प्रकरणात तील आरोपींचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
कोट” या प्रकरणात पोलिसांनी दोन मारेकऱ्यांना आधीच ताब्यात घेतले आहे. आणखी दोघांचा कसून शोध घेतला जात आहे. कोणत्याही परिस्थितीत मारेकऱ्यांना सोडले जाणार नाही. -निकेतन कदम, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ५
”पोलिसांनी या संदर्भात दोघांना ताब्यात घेतले आहे. इतरांचा शोध सुरू आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून हा खून झाल्याने त्यांच्या प्रॉपर्टीवर सुद्धा कारवाई करणे गरजेचे आहे. ” -दया शंकर तिवारी, माजी महापौर, भाजपा शहराध्यक्ष
