नागपूर : रॉग साईड गाडी, ट्रिपल सिट, सिग्नल न थांबणे, कर्णकर्कश आवाज करणे, बुलेटवर फटाके फोडणे असे प्रकार सध्या शहरात रोज घडत आहे. कोवळ्या वयातली मुले हे कृत्य करत असल्याने अपघातांची संख्या देखील वाढत आहे. याला आवर घालण्यासाठी आता वाहतूक नियम मोडणाऱ्या अशा बदमाशांच्या करिअरचा देखील विचार करू नका, त्यांच्यावर जितकी कलमे लावता येतील, तितकी लावा आणि या बदल्यात त्यांच्या पालकांना गुन्हेगार करा, असा सज्जड दम भरत पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी पोलीसांचाच क्लास घेतला.

शहरातील बेशिस्त वाहतूकीला वळण लावण्यासाठी वाहतूक शाखेने २० ऑगस्ट पासून शहरातील खासगी ट्रॅव्हल्स बस चालकांना शहराच्या हद्दीत प्रवेशावर बंदी घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर साधलेल्या संवादात पोलीस आयुक्त सिंगल म्हणाले, शहराचा विस्तारता परिघ, वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणारी कोंडी फोडायची असेल, तर वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आवश्यक आहे. नव्या कायद्यात अल्पवयीन मुले वाहने चालवताना आढळली, तर पालकांना दोषी धरत गुन्हा दाखल करून दंडाची तरतूद आहे. त्यामुळे कायद्याला हरताळ फासून इतरांच्या जीवाशी खेळणाऱ्यांच्या करीअरचा आजीबात विचार करू नका.

वाहतूक हा कोणत्याही शहराचा आरसा तर रस्ते हे त्या शहरच्या रक्तवाहिन्या असतात. चुकीच्या मार्गाने वाहने चालविणे, दुचाकीवर ट्रीपल सिट प्रवास, भरधाव वाहन चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन कोणत्यीही परिस्थितीत सहन होणार नाही. खासगी ट्रॅव्हल्स बस चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असतील तर पोलिसांनी कारवाई करताना कोणालाही घाबरण्याची अथवा दबावात येण्याची गरज नाही. वाहतूक नियमांचा भंग करून कायदा हाती घेणाऱ्यांची कोणत्याही परिस्थिती गय केली जाणार नाही. अल्पवयीन मुले जर वाहतूक नियम मोडून ट्रिपल सिट, विरुद्ध दिशेने वाहन चालवताना आढळली तर पालकांवर गुन्हे दाखल करण्याची तरतूद नव्या वाहतूक कायद्यात आहे. यापुढे शहरात वाहतूक नियम मोडण्याची कोणी हिंमत करणार नाही, अशी कायदेशीर कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार प्रत्यक्ष रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीसांना असतील. चारकाची वाहनचालक सिट बेल्ट अथवा भ्रमणदूरध्वनीवर बोलत वाहन चालवताना आढळली तर त्यांच्यावरही नव्या भारतीय दंड संहिता (बी.एन.एस) नुसार कारवाई केली जाई. गरज नसताना वाहनांचा कर्कश्य हॉर्न वाजविणाऱ्या गाड्यांमधील हॉर्न जप्त होतील. बुलेट सारख्या वाहनांचे सायलेंसर बदलून फटाके फोडले जातात, हे गंभीर आहे. त्यांच्यावरही कडक कारवाई होईल.

पोलिसाने बूथवर थांबणे अनिवार्य

रात्रीच्या वेळी ऑपरेशन यु टर्न राबवले जात आहे. आगामी टप्प्यात शुक्रवार पासून दुपारी देखील ही कारवाई होईल, असे स्पष्ट करीत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी म्हणाले, मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांची यापुढे गय नाही. निष्काळजी पणे वाहन चालवताना आढळला तर नव्या बीएनएस कायद्यानुसार गुन्हा दाखल होईल. अल्पवयीन मुले वाहन चालवताना दिसली तर पालकांना दोषी धरले जाईल. १० वाहतूक परिमंडळात दररोज १० या प्रमाणे किमान १०० कारवाया होतील. ही वाहने तत्काळ जप्त होतील. वाहतूक पोलिसाला त्यासाठी लेखी निवेदन मिळेल. यात पोलीसाने केवळ ठाण्यातल्या बीट मार्शलला संदेश द्यायचा आहे. बीट मार्शल घटनास्थळी येऊन पुढील कारवाई करीत निवेदन घेऊन जाईल. त्यासाठी पोलीसाला कर्तव्याचे ठिकाण सोडण्याची गरज नाही. अकस्मात भेट देऊन पथक कर्तव्यावरील पोलिसावर वॉच ठेवतील.

बॉडी ओन कॅमेरा वापरा

वाहतूक पोलिसांवर होत असलेल्या हल्यांवर चिंता व्यक्त करीत सह पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी म्हणाले, प्रत्येक वाहतूक पोलिसाला बॉडी ऑन कॅमेरा दिला आहे. कर्तव्यावर असताना पोलिसाने तो वापरणे अनिवार्य आहे. अनुचित घडू नये यासाठी पोलिसांनी स्वतः सोजन्याने वागणे आवश्यक आहे. तशी प्रत्येकाला तंबी देण्यात आली आहे.