मैत्रिणीच्या घरी जाते असे पतीला सांगून प्रियकरासोबत आठ दिवस राहणाऱ्या महिलेचे प्रियकराने अश्लील छायाचित्र आणि चित्रफीत काढली. ती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. अखेर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. महिलेच्या प्रियकराविरुध्द जरीपटका पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सूरज धनवटे (रा. वाकोडी) असे आरोपीचे नाव आहे.
सूरज धनवटे आणि पीडित ३० वर्षीय महिला यांच्यात मागील ४ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यादरम्यान दोघांनी सहमतीने अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, सुरजच्या कुटुंबियांनी लग्नास विरोध केल्यामुळे लग्न होऊ शकले नाही. दरम्यान प्रेयसीचे खापा येथील युवकासोबत लग्न केले. लग्नानंतरही तिचे आणि सूरजचे प्रेमसंबंध कायम होते. पती घरी नसताना दोघांच्या भेटी सुरु होत्या. तसेच माहेरी आल्यानंतर ती चक्क प्रियकराच्या घरी राहायला जात होती. १३ मे रोजी सूरजने तिला फोन केला आणि नागपूरला भेटायला बोलावले. तिने पतीला मैत्रिणीकडे मुक्कामी जात असल्याचे सांगितले आणि बसने नागपूर गाठले. बसस्थानकावर सूरज दुचाकी घेऊन उभा होता. त्याने तिला गौतमनगर येथील मित्राच्या खोलीवर नेले आणि ८ दिवस तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. या दरम्यान तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफीत काढली. ‘कुणाला काही सांगिल्यास प्रसारित करणार’ अशी धमकी दिली.
दरम्यान प्रियकरासाठी पतीशी खोट बोलून घराबाहेर पडलेली महिला २० मे रोजी भावाच्या घरी गेली. त्यानंतर ती पतीच्या घरी गेली. २१ जुलै रोजी ती गर्भवती असल्याचे तिला समजले. त्यामुळे तिला धक्काच बसला. घडलेला प्रकार तिने पतीला सांगितला. त्यामुळे पतीने व तिच्या भावाने तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिची प्रकृती बिघडल्याने तिला मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी तरुणीने खापा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून पुढील तपासासाठी हे प्रकरण जरीपटका पोलिसांकडे वर्ग केले आहे.