नागपूर : पतीच्या मनात पत्नीच्या चारित्र्यावरील संशयाचे भूत घुसले. त्यातून दारुचे व्यसन आणि पत्नी, मुलांकडे दुर्लक्ष झाल्याने संसार तुटला. मुलांनाही वडिलांसोबत राहण्यास नकार देत वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांकडून तुटल्यामुळे व्यसनाधीन पिता मनाने खचला. मात्र, पोलिसांनी तुटलेला संसार पुन्हा नव्याने जोडला. आज खचलेल्या बापासाठी मुलगीच आधार बनली. अंबाझरीमध्ये राहणारे विलास हे वनविभागात नोकरीवर आहेत. त्यांचे प्रीती (काल्पनिक नाव) हिच्याशी लग्न झाले. दहा वर्षे संसार सुरळीत सुरु होता. त्यांना एक मुलगा आणि मुलगी झाली. पती दिवसभर नोकरीवर गेल्यानंतर संसाराला हातभार म्हणून प्रीतीने ब्युटीपार्लरचे काम सुरु केले. यादरम्यान, विलास यांची भंडारा जिल्ह्यात बदली झाली. त्यांनी पत्नी व मुलांना घेऊन भंडारा येथे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रीतीने मुलांच्या शिक्षणासाठी नागपुरात राहण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय विलास यांना पटला नाही.
एका वर्षानंतर विलास यांनी पुन्हा पत्नी प्रीतीला भंडाऱ्याला नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात ते यशस्वी झाले नाही. त्यानंतर विलास यांच्या मनात पत्नीच्या चारित्र्यावर संशयाचे वादळ घोंगावत राहिले. त्यातून त्यांना दारुचे व्यसन जडले. तेव्हापासून घरी आल्यानंतर तो दारु पिऊन वाद घालायला लागला. पत्नीला मारहाण करायला लागला. भांडणात मुलांनाही मारहाण करायला लागला. काही वर्षांनंतर विलासची बदली पुन्हा नागपुरात झाली. त्यानंतर रोज भांडण,मारहाण व्हायला लागली. वडिलाच्या भीतीमुळे मुलेसुद्धा दहशतीत आली. दारु पिऊन नेहमी आईला मारहाण होत असल्यामुळे मुलेसुद्धा वडिलाचा राग करायला लागली. वडिलाचे दारुचे व्यसन वाढले आणि मुलेसुद्धा मोठी झाली.
पित्यापासून वेगळे राहण्याचा निर्णय
मुलगी एमबीए होऊन नोकरी करायला लागली तर मुलगा शिक्षण घेत होता. मुलीने भाऊ आणि आईची जबाबदारी घेतली आणि वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. हळूहळू अंतर वाढले आणि पित्यापासून मुले तुटली. त्यामुळे पती-पत्नीचा संसारही मोडला.
भरोसा सेलमध्ये समूपदेशन
विलास-प्रीती यांचे प्रकरणी भरोसा सेलमध्ये पोहचले. पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे आणि समूपदेशक समीधा इंगळे यांनी प्रीती, मुलगी व मुलाशी संवाद साधला. यावेळी तिघांनाही विलास यांचा चेहराही बघण्याची इच्छा नव्हती. पित्याने आजाराने विळखा घातल्याचे सांगितले. पत्नी-मुलांसह राहण्याची इच्छा दर्शविली. दारु सोडण्याचा निर्णय घेतला. पत्नीची माफी मागून मुलांकडे आशेच्या नजरेने बघू लागला.
वडिलाचा आधार बनली मुलगी
वडिल म्हणून तुम्ही आमच्यासाठी काय केले? असा प्रश्न विचारताच विलास ढसाढसा रडायला लागला. त्याने मुलीच्या नावाने काही पैसे बँकेत जमा केले तर दोन वर्षांपूर्वीच मुलासाठी नवीन बुलेट घेऊन ठेवली. पत्नीसाठी काही साड्या आणि दागिने करुन ठेवले. मुलीच्या लग्नाची तयारी म्हणून एक भूखंड घेऊन ठेवल्याचे सांगून फक्त मला तुमच्या सानिध्यात राहू द्या, आजारपणामुळे शेवटचे काही क्षण कुटुंबात राहण्याची इच्छा व्यक्त केली. हे सर्व ऐकून दोन्ही मुलांनी वडिलांना कवटाळले. मुलीने वडिलाचा आधार बनून त्यांच्या आजारपणाची जबाबदारी घेतली.