नागपूर : युवक कॉंग्रेसमधील नियुक्त्यांमध्ये गौडबंगाल असून, अनेक नियुक्त्या अनधिकृतपणे दिल्या जात आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना डावलून परस्पर निर्णय घेतले जात आहेत. युवक कॉंग्रेसच्या नावे जमा निधीचाही कुठेही हिशेब नाही. त्यामुळे जमा झालेल्या १० कोटी निधीचा तातडीने अंकेक्षण होणे आवश्यक आहे. नियुक्त्या व अंकेक्षणाबाबत वरिष्ठांना कळविले आहे. दहा दिवसात याबाबत उत्तर न दिल्यास युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी हायकोर्टात धाव घेतील, असा इशारा नागपूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आशीष मंडपे यांनी पत्रपरीषदेत दिला.

माजी प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या कामात अडथळा आणण्याचे काम विद्यमान अध्यक्ष शिवराज मोरे व इतर गटातील पदाधिकाऱ्यांनी केले. राऊत हे दलित समाजाचे असल्याने इतरांना ते रूचत नव्हते. राज्यात मोठया सभा व पदयात्रा राऊत यांच्याच काळात काढण्यात आल्या. जातपात सोडून सर्वांना सोबत घेऊन त्यांनी काम केले. परंतु, त्यांना हटविले गेले. संघ कार्यालयावरील मोर्चावेळीही दांडी मारणाऱ्या ६० पदाधिकाऱ्यांना त्यांनी पदमुक्त केले. पण, काही दिवसानंतर कायमस्वरूपी निलंबित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना परत पदांवर घेण्यात आले. परंतु ,दिल्लीतील लोकांना हाताशी धरून सुडबुध्दीने कुठलीही चूक नसताना कुणाल राऊत यांना हटविण्यात आले.

युवक कॉंग्रेसच्या अनेक कार्यक्रमांना त्यांनी स्वत: खर्च केला. उलटपक्षी, युवक कॉंग्रेस सदस्यत्वासाठी २० लाख जणांकडून १० कोटीचा निधी गोळा झाला. हा निधी युवक कॉंग्रेसच्या कार्यक्रम व आंदोलनावर खर्च होणे अपेक्षित आहे. परंतु, हा निधी कुठेही खर्च करण्यात आला नसल्याचा दावा मंडपेंनी केला. शिवाय, नियुक्तींच्या पत्रावर प्रदेश निरीक्षकांची स्वाक्षरी असायची. असल्यास ते मान्य केले जायचे. आता प्रदेशाध्यक्षच पक्षातून काढलेल्यांना परत घेऊन पदे देत आहे. हे सर्व अनुचीत असून, याकडे दिल्लीश्वरांनी डोळे बंद करून ठेवल्याचा गंभीर आरोपही मंडपेंनी केला.

शिवराज मोरे प्रदेशाध्यक्षपदासाठी अपात्र

युवक कॉंग्रेसच्या सदस्यत्वासाठी १८ ते ३५ ही वयोमर्यादा आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे हे ३७ वर्षांचे आहेत. युवक कॉंग्रेसच्या नियमानुसार ते यासाठी अपात्र आहेत. त्यांच्यावर एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष असताना पेट्रोल पंपावर धुडगुस घातल्याचा गुन्हाही आहे. वयोमर्यादेबाहेर असलेल्या अपात्रास प्रदेशाध्यक्ष पद देणे गैर असून, त्यांना तातडीने पदमुक्त करावे अशी मागणीही मंडपे यांनी केली.