नागपूर : पक्ष नेतृत्वाने संघटना मजबूत करण्यासाठी नागपूर शहरात दोन जिल्हा प्रमुखांची नियुक्ती केली आहे. परंतु महापालिका निवडणुका तोंडावर असताना उद्धव ठाकरे सेनेत अंतर्गंत धुसफूस दिसून येत आहे. एका गटाने शहरात केवळ एकच जिल्हा प्रमुख असावा, अन्यथा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होते, असा दावा केला आहे.

अलिकडे रेशीमबागेतील सेना भवन येथे आयोजित एका बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी शहरात दोन नव्हे तर एकच जिल्हाप्रमुख करा, अशी मागणी शहराचे संपर्क प्रमुख सतीश हरडे यांच्याकडे केल्याची माहिती आहे.

सध्या शहरात माजी उपमहापौर किशोर कुमेरिया आणि प्रमोद मानमोडे असे दोन जिल्हाप्रमुख आहेत. परंतु त्यामुळे दोन गट पडले असून पक्षाची ताकद कमी होत असल्याची चर्चा बैठकीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिकेच्या निवडणुकीतही एकच जिल्हाप्रमुख करून त्यांच्याच नेतृत्वात महापालिकेची निवडणूक लढावी, याकडेही अनेकांनी लक्ष वेधले. अशा प्रकारे दोन गट निर्मण झाल्यास पक्षाला परवडण्यासारखे नाही, अशी चर्चा झाली.

काही दिवसांपूर्वी उद्धव सेनेने संपर्क शहर प्रमुखपदी सतीश हरडे यांची नियुक्ती केली आहे. अनेक वर्षे गोंदिया, भंडारा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या हरडे यांना परत नागपूर शहरात आणून उद्धव सेनेने कार्यकारिणी बदलाचेही संकेत द्विले आहेत. हरडे हे यापूर्वी जिल्ह्याचे दोन वेळा जिल्हा प्रमुख होते. हरडे यांनी मध्य नागपूर मतदारसंघातून निवडणूकही लढवली आहे. नागपूर सोडून ते गोंदिया, भंडारा जिल्ह्याचे सहसंघटक होते.

शहरात प्रमोद मानमोडे आणि माजी उपमहापौर किशोर कुमेरिया असे दोन्ही जिल्हा प्रमुख आहेत. नितीन तिवारी, दीपक कापसे आणि प्रवीण बरडे हे शहर प्रमुख आहेत. शहराचे संपर्क प्रमुख व माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी हे शिंदे सेनेत यापूर्वीच दाखल झाले आहेत. जुने शिवसैनिक या नात्याने हरडे यांचा सर्वांसोबत संबंध आहेत. उद्धव सेना महाआघाडीत सहभागी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने आघाडीचा निर्णय स्थानिक नेत्यांकडे सोपवला आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी करण्याच इच्छुक नाहीत. अशा विपरित परिस्थिती हरडे यांच्यावर संपर्क मंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. नव्या निवड, नियुक्त्या आणि महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपाचा अधिकार संपर्क प्रमुख या नात्याने आता हरडे यांच्याकडे येणार आहे. अलिकडे त्यांनी दोन्ही जिल्हा प्रमुखांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या आणि महापालिका निवडणुकीचा आढावा घेतला.