scorecardresearch

भूमिअभिलेखमधील पदोन्नतीला नागपूर विभाग मुकला; पात्रता परीक्षेच्या निकालाला विलंब भोवला

कर्मचारी संघटना व शासन यांच्यात पदोन्नतीच्या मुद्यावरून अनेकदा संघर्ष  होतो. परंतु शासन पदोन्नतीसाठी तयार असताना त्यासाठी पात्र कर्मचारीच न मिळणे अशी वेळ अपवादात्मक प्रसंगी येते.

भूमिअभिलेखमधील पदोन्नतीला नागपूर विभाग मुकला; पात्रता परीक्षेच्या निकालाला विलंब भोवला
(संग्रहीत छायाचित्र)

नागपूर : कर्मचारी संघटना व शासन यांच्यात पदोन्नतीच्या मुद्यावरून अनेकदा संघर्ष  होतो. परंतु शासन पदोन्नतीसाठी तयार असताना त्यासाठी पात्र कर्मचारीच न मिळणे अशी वेळ अपवादात्मक प्रसंगी येते. भूमिअभिलेख विभागाने एकाच वेळी राज्यातील ७५ कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली. फक्त नागपूर विभागात अटी, शर्तीची पूर्तता करणारे कर्मचारीच उपलब्ध सधी नसल्याने एकही कर्मचारी पदोन्नत होऊ शकला नाही. भूमिअभिलेख खात्यातने राज्यभरातील एकूण ७६ कर्मचाऱ्यांना अलीकडेच पदोन्नत केले. पदोन्नतीसाठी अर्हता परीक्षा उत्तीर्ण करणे व एका गट समूहात तीन वर्षांपेक्षा अधिक सेवा पूर्ण करणे हे निकष पूर्ण करावे लागतात. या आधारावरच विभागाने ५ ऑगस्ट २०२२रोजी राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती विभागातील ७६ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले. यात अमरावती विभागातील १५ कर्मचारी, नाशिक विभागातील १६, पुणे विभागातील १८ कर्मचारी, औरंगाबाद विभागातील ९ आणि मुंबई विभागाताल १८ अशा एकूण ७६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पण यात नागपूर विभागाचा समावेश नाही. कारण या विभागात पद समूह तीनमध्ये तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे तसेच अर्हता परीक्षा उत्तीर्ण करणारे कर्मचारी उपलब्ध नव्हते. मे २०२२ मध्ये  अर्हता परीक्षा झाली. पण परीक्षेचा निकाल लागण्यास विलंब झाला. त्याचा  फटका कर्मचाऱ्यांना बसला. परीक्षेचा निकाल तातडीने लावावा, अशी मागणी कर्मचारी संघटनेने जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांचे कडे केली आहे. 

दरवर्षी विभागीय पदोन्नती समितीची बैठक होऊन त्यात पदोन्नतीसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाते. यंदा झालेल्या पदोन्नतीसाठी मागणी वर्षी समितीने निवड केलेल्या कर्मचाऱ्यांना संधी मिळाली. यावर्षी सप्टेंबर महिन्यात ही बैठक होणे अपेक्षित  आहे. त्यापूर्वी अर्हता परीक्षेचा निकाल जाहीर झाला तर नागपूर विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी आहे. पण ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन आदेश निघेपर्यंत वर्षांचा काळ लोटतो, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या पदोन्नतीमुळे मुख्यालय सहाय्यक व शिरस्तेदार यांची पदे भरल्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यातील भूमिअभिलेख कार्यालयातील कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. सध्या विभागाने गावठाण मोजणी, ड्रोनद्वारे सर्वेक्षण, ऑनलाईन फेरफार, ई-मोजणी आदी योजना हाती घेतल्या आहेत. यातच ‘सर्वेअर’ ची १२५० कर्मचाऱ्यांची भरती थांबली आहे.

भूमिअभिलेख अर्हाता परीक्षेचा निकाल लागण्यास विलंब झाल्यामुळे  नागपूर विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी पासून वंचित राहावे लागले.’’

– श्रीराम खिरेकर, सरचिटणीस, विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.