नागपूर : उपराजधानीचा विकास वेगाने होत आहे. परंतु येथील अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. धंतोली परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमिताभ पावडे यांच्या अपघाती मृत्यूने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे, अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ते ॲड. अक्षय समर्थ आणि केंद्रीय रस्ता सुरक्षा परिषद, भारत सरकारचे सदस्य डॉ. चंद्रशेखर मोहिते यांनी शहरातील वाहतुकीच्या सद्यस्थितीवर भाष्य केले.

लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी ॲड. अक्षय समर्थ म्हणाले, शहरात नव्याने होणाऱ्या उड्डाणपुलामुळे अपघात नियंत्रणात यायला हवेत. परंतु, उलट घडत आहे. रिझर्व्ह बँक चौकात उड्डाणपुलामुळे नवीन ‘ब्लॅक स्पाॅट’ तयार झाला. हा राष्ट्रीय महामार्गच बंद पडला. पूल बांधताना अधिकारी निद्रावस्थेत होते का? शहरातील इतर भागातही नवीन रस्ते बांधकामानंतर ‘ब्लॅक स्पाॅट’ वाढले. सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार हे ‘ब्लॅक स्पाॅट’ वाढवण्याला कारणीभूत आहेत. त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे अपघातात नागरिकांचा बळी जात आहे, असा आरोपही ॲड. समर्थ यांनी केला.

मेट्रोचे खांब चुकीच्या ठिकाणी

डॉ. चंद्रशेखर मोहिते म्हणाले, धंतोलीसह शहरातील अनेक भागात नियम धाब्यावर बसवून मेट्रोचे खांब उभारले गेले. हे खांब अभियांत्रिकी तज्ज्ञांच्या सल्ल्याने समोर-मागे करून सुरक्षित ठिकाणी उभारणे शक्य होते. परंतु नियोजनशून्य अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. धंतोली परिसरातही तेच झाले. येथे रस्त्याच्या मध्ये मेट्रोचे खांब आले. त्यामुळे दोन परस्पर विरोधी दिशेने येणाऱ्यांना समोरचा माणूस दिसत नाही. त्यातूनच अपघात होत आहेत. हे खांब गोल आकारात उभारता येऊ शकले असते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता भविष्यात तरी अपघात टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी बुद्धीचा वापर करावा, असा सल्लाही डॉ. मोहिते यांनी दिला.

अपघाताची नेमकी कारणे काय?

अरुंद गल्ल्या, अंतर्गत वसाहती रस्ते, रस्त्यांची चुकीची रचना व पायाभूत समस्या, वाहनांना जागा कमी, साइड-स्वाईप, ओव्हरटेक करताना धडक ही अपघाताची कारणे आहेत. सोबत अचानक वळणे/ ब्लाईंड इंटरसेक्शन (कोपऱ्यावर भिंती/दुकाने), समोरचे वाहन/पादचारी दिसत नाही. अरुंद रस्त्यांवर फुटपाथ नाहीत, असलेल्या भागात अतिक्रमण, पादचारी रस्त्यावर चालणे हेही एक कारण आहे. खड्डे, सिमेंट रोड व गट्टू असलेले उंच-खोल रस्ते व त्यावरून दुचाकी घसरण्याचे प्रमाणाही यामुळे घडत आहेत. यशवंत स्टेडियम परिसरात वाहनतळाचा प्रश्न गंभीर आहे. तरीही स्टेडियमच्या विकासाच्या नावाने येथे लोकांची गर्दी होईल अशाच पद्धतीने नियोजन केले जात आहे. त्यामुळे येथील अपघात आणखी वाढण्याचा धोका असल्याचे समर्थ यांनी सांगितले.

‘ब्लॅक स्पाॅट’कडे दुर्लक्ष धोकादायक

एखाद्या भागात वारंवार अपघाती मृत्यू होत असल्यास त्याला ‘ब्लॅक स्पाॅट’ घोषित केले जाते. तातडीने अपघातांचे कारण माहिती करून त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. यासाठीच्या समितीत सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ, वाहतूक पोलिसांसह स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी असतात. नागपुरातील समितीने सूचना केल्यावरही ‘ब्लॅक स्पाॅट’वर दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे अपघात सुरूच असून ‘ब्लॅक स्पाॅट’कडे दुर्लक्ष धोकादायक ठरू शकते, असा इशाराही डॉ. मोहिते यांनी दिला.