नागपूर : विमानतळाच्या अगदी शेजारील समर्थ नगरात बुधवारी भल्या सकाळी साडे सात वाजता अंगणात बसलेले गंगाधर हरणे (८०) यांनी पत्नी निर्मला सोबत (७०) टॅफगोर किटकनाशकाची संपूर्ण बाटली प्राशन केली. दोघेही विष प्राशन केल्यानंतर वेदनेने तळमळत होते. त्यांच्या नाकातोंडाला फेस येत होता. रस्त्यावरून हे विदारक चित्र पहात शेजारचे अनेक जण गेटच्या बाहेरूनच कुजबूज करत होते पण त्यांना रुग्णालयात हलविण्यासाठी एकही जण मदतीला धावला नाही. स्वतःला उच्चशिक्षित म्हणवून घेणारे सगळेच नुसता तमाशा पहात ऊभे होते.

सरकारी सेवेतून निवृत्त गंगाधर हरणे यांना कसलीही आर्थिक विवंचना नव्हती. मात्र तरीही आम्ही आता थकलो आहोत. एकटेपणाने जीव नकोसा झालाय. यापुढे जगायची इच्छा नाही. वृद्धत्व आणि आजारपणाचा कंटाळा आलाय, अशा आशयाच्या तीन चिठ्या मागे सोडत, या दाम्पत्याने किटकनाशक प्राशन केले. हरणे यांचा मुलगा सुधीर नोकरी निमित्त भिलाईत तर मुलगी शुभांगी लग्नानंतर ओंकारनगरातल्या सासरी राहते.

अर्धी कॉलनी एकाकी

विमानतळाच्या पाठभिंतीला लागून असलेली समर्थ नगरी आणि एच. बी. इस्टेट या वसाहती सुखवस्तू, उच्चभ्रू कुटुंबाच्या आहेत. या भागातली बहुतांश घरे दोन मजली आहेत. सधन कुटुंब असल्याने इथल्या बहुतांश घरांमधली तरुण मुले नोकरी, शिक्षणानिमित्त बाहेरगावी राहतात. काही जण तर परदेशात स्थायिक झाली आहेत. मात्र मोठ मोठ्या घरात आयुष्याच्या सायंकाळी थकलेले शरीर घेऊन एकमेकांच्या सोबतीने फक्त वृद्ध राहत आहेत. ही केवळ या वस्तीची समस्या नाही तर शहरातल्या अनेक भागांमधली सार्वत्रिक समस्या बनत आहे. आयुष्याच्या सायंकाळी एकाकीपणाचा शाप हा हजारो वृद्धांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत चालला आहे.

पत्नीची मृत्यूशी झुंज

टुमदार दोन मजली बंगला, दरमहा पुरून उरेल इतके निवृत्ती वेतन, धन दौलत, पैसा अगदी कशाचीही कमतरता नाही. पाहणाऱ्याला हेवा वाटावा असा हिरवागार बगिचा असलेले अंगण. पण त्याच हिरव्यागार अंगणाला बुधवारी नजर लागली. घराच्या प्रवेशद्वारावर व्हरांड्यात किटकनाशक प्राशन करत गंगाधर हरणे (८०) यांनी पत्नी निर्मला यांच्यासोबत विषारी किटकनाशक प्राशन केले. आपलाच शेजारी दाम्पत्य वेदनांनी तळमळ आहे, हे दिसत असतानाही स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारा एकही व्यक्ती या दोघांच्या मदतीला धावला नाही. अखेर विषाने धर्म पाळला.

गंगाधर हरणे (८०) यांनी पत्नी निर्मला यांच्यासोबत विषारी किटकनाशक प्राशन केले. आपलाच शेजारी दाम्पत्य वेदनांनी तळमळ आहे, हे दिसत असतानाही स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारा एकही व्यक्ती या दोघांच्या मदतीला धावला नाही. अखेर विषाने धर्म पाळला अनेकांच्या डोळ्यांदेखत गंगाधर यांचा मृत्यू झाला. आता त्यांच्या पत्नी निर्मला मृत्यूशी झुंज देत आहेत.