‘व्हॅलेंटाईन्स डे’ निर्धोक साजरा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजप आणि शिवसेनेच्या राजकीय प्रेमात महापालिका निवडणुका तोंडावर असतानाच विरहाची ठिणगी पडली. ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या पाश्र्वभूमीवर आलेल्या निवडणुका आणि त्यातच अडीच दशकांचे संपुष्टात आलेले प्रेम यामुळे शिवसेना आणि भाजप प्रेमभंगाच्या दु:खात असतानाच, तरुणाईने मात्र या प्रेमभंगाचा पुरेपूर फायदा घेतला. एरवी समाजाचे रक्षणकर्ते असा बडेजाव मिरवणाऱ्या भाजप-सेनेच्या पिलावळींना निवडणुकांमुळे ‘व्हॅलेंटाईन्स डे’ विरोध गुंडाळून ठेवावा लागल्याने शहरातील तरुणाईने मात्र मोकळया वातावरणात हा प्रेमाचा दिवस साजरा केला.

२७ वर्षांपूर्वी हिंदुत्त्वाच्या मुद्दय़ावरून सेना-भाजप युती झाली. शिवसेना, भाजप आणि संमिश्र मानसिकतेचा युतीचा मतदार होता, पण आता यातील मिश्र मानसिकतेचे मतदार स्वत:कडे ओढण्यासाठी दोन्ही पक्षांची चढाओढ सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मनसे, शिवसेना, बजरंग दल आदी राजकीय पक्षांनी ‘व्हॅलेंटाईन्स डे’ साजरा करण्यासाठी विरोध केला होता. यंदा मात्र महापालिका निवडणुकीचे रणशिंग ऐन या प्रेमदिनाच्या पाश्र्वभूमीवर फुंकण्यात आले. त्यामुळे मतदारराजाला खुश करण्यासाठी विरोध करणाऱ्या याच राजकीय पक्षांचा विरोध मावळलेला दिसून आला.

विरोध करणाऱ्या पक्षांवर तरुण मतदारांची नाराजी ओढवून घेणे परवडणारे नसल्यामुळे ही भूमिका घेण्यात आल्याची चर्चा शहरात होती. प्रेमदिन साजरा करण्यासाठी तरुणाईसाठी शहरातील उद्याने स्वस्त आणि मस्त असे ठिकाण होते. प्रेमदिनाच्या दिवशी या उद्यानात ओसंडून वाहणाऱ्या प्रेमाला आवर घालण्यासाठी ‘स्वघोषित संस्कृतीचे रक्षणकर्ते’ लवाजम्यासहीत पोहोचत होते. प्रेमाच्या बहरात असलेल्या तरुण-तरुणीचे लग्न लावून देण्यापासून तर त्यांना मारहाण करण्यापर्यंत यांची मजल गेली होती. त्याही आधी शुभेच्छा पत्र, भेटवस्तूंचा काळ असल्याने या दुकानात तोडफोड केली जात होती. आता ही दुकाने ओस पडली आहेत आणि तरुणाई हा दिवस साजरा करण्यासाठी वेगळया वाटेवर पडली आहेत. ही वाट अडवणाऱ्या या संघटनांची मात्र महापालिका निवडणुकीने चांगलीच पंचाईत केली आहे. तरीही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थोडी वळवळ करण्याचा प्रयत्न केला. प्रसारमाध्यमांना बोलावून गांधीबाग उद्यानासमोर शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न केला खरा, पण तो थिटा पडला. या उद्यानात त्यांना एकही जोडपे मिळाले नाही आणि उद्यानाबाहेर येऊन त्यांच्यावर परतण्याची वेळ आली. गेल्या दोन वर्षांत या स्वघोषित संस्कृती रक्षकांचा प्रभाव तसाही कमी झाला होता, पण यावेळी तो पुरताच ओसरल्याने फुटाळापासून तर व्हीआयपीरोड, धरमपेठ परिसरात तरुणाई मुक्तपणे बहरली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur elections 2017 valentines day 2017 valentines day 2017 in nagpur municipal elections in nagpur
First published on: 15-02-2017 at 02:52 IST