नागपूर : अंबाझरी मार्गावरील ‘एनआयटी’च्या जलतरण तलावासमोरील रस्ता दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत कारने व्यापलेला असतो. याकडे वाहतूक पोलिसांच्या ‘टोईंग व्हॅन’चे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उत्तर अंबाझरी मार्गावर दिवसभर मोठी वर्दळ असते. वाडी-एमआयडीसी-हिंगणा परिसरात जाण्यासाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. जवळच महाविद्यालय सुद्धा आहे. या मार्गावर पायदळ चालणाऱ्यांचीही मोठी संख्या आहे. याच मार्गावर असलेल्या एनआयटी अंबाझरी जलतरण तलावावर सध्या उन्हाळा असल्यामुळे येथे पोहण्यासाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी असते.

विशेष करून उच्चभ्रू वस्तीतून येणारे प्रशिक्षणार्थी किंवा पोहणारे कारने येतात. मात्र, या परिसरात कार पार्किंग नसल्यामुळे मोठी अडचण होत आहे. जलतरण तलावावर पोहण्यासाठी येणारे त्यांची कार पदपाथावर उभी करतात. त्यामुळे अंबाझरी टी पॉईंटपासून ते पांढराबोडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या चौकापर्यंतच्या पदपाथावर दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत कार उभ्या ठेवलेल्या असतात.

हेही वाचा : उद्योजक बिर्लांसह आठ जणांना नोटीस, अकोला ऑईल इंडस्ट्रिजच्या जमीन घोटाळ्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर अंबाझरी मार्गावरील पदपथावर वाहतूक विभागाने एकदाही कारवाई केली नाही. बहुतांश कार रस्त्यावर उभ्या असतात. मात्र, नो पार्किंगमधील वाहने उचण्यास तत्पर असलेल्या वाहतूक पोलिसांना एकदाही जलतरण तलावाजवळील कारवर कारवाई करताना बघण्यात आले नाही. हा सर्व प्रकार पोलीस उघड्या डोळ्यांनी बघतात. मात्र, कारवाई करत नाहीत. वाहतूक पोलिसांचे जलतरण तलावाच्या संचालकांशी अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : अकोला : ज्वारीच्या उत्पादनात वाढ, मात्र हमीभाव मिळेना; उन्हाळी ज्वारीकडे शेतकऱ्यांचा…

नागरिकांशी नेहमी वाद

कारचालक मनमानी करीत रस्त्याच्या कडेला किंवा थेट पदपथावर कार उभी करतात. सायंकाळी फिरायला येणाऱ्या परिसरातील नागरिकांशी ते वाद घालतात. कारचालक नागरिकांशी वाद घालून अरेरावी करीत असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.

वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा स्थितीत उभ्या असलेल्या वाहनांवर नेहमी कारवाई करण्यात येते. पदपथ फक्त पायी चालणाऱ्यांसाठी आहे. जलतरण तलावाजवळील पदपथावर कार पार्किंग केल्यास त्यांच्यावर नियमांनुसार कारवाई करण्यात येईल.

विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग.