नागपूर : उपराजधानीत अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. परंतु अधून-मधून पडणाऱ्या पावसामुळे अतिसार, विषमज्वराचे रुग्ण वाढले आहेत. पावसामुळे पिण्याचे पाणी दूषित झाल्यास अतिसार- गॅस्ट्रो, पटकी (कॉलरा), विषमज्वर, कावीळ, हगवण या सारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. शहरी भागात अद्यापही चांगला पाऊस नाही. परंतु कमी पावसामुळेही जलजन्य आजाराचे रुग्ण वाढत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, मागील दीड महिन्यात शहरात अतिसाराचे १६५ तर विषमज्वरचे ३७ आणि कावीळचे ३ रुग्ण नोंदवले गेले. प्रत्यक्षात ही रुग्णसंख्या याहून बरीच जास्त असू शकते.

शहरात खासगी रुग्णालयांकडून अनेक रुग्णांच्या नोंदी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे केल्याच जात नाहीत. त्यामुळे महापालिकेकडे खूपच कमी रुग्णांच्या नोंदी होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगतात. त्यातच उघड्यांवरील खाद्यपदार्थावर माशा बसून या आजाराचे प्रमाण वाढत आहे. महापालिकेकडून गृहभेटी, सर्वेक्षणाच्या कामाला गती देण्यात आली असून स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा…नागपूर विद्यापीठ पुन्हा चर्चेत, माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यावर कोट्यवधीची उधळपट्टी होणार ?

महापालिकचे म्हणणे काय?

शहरी भागात यावर्षी जानेवारीपासून जलजन्य आजाराचे रुग्ण आढळत आहेत. त्यानुसार अतिसाराचे ५८७, विषमज्वरचे ९०, काविळचे १४ रुग्ण आढळले. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने साथरोग प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजनेअंतर्गत या रुग्णांच्या निवासस्थान व परिसराला भेट दिली. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून या आजाराचा उद्रेक टाळण्यासाठी रुग्णांकडे गृहभेटी, सर्वेक्षण, जनजागृती, पाणी नमुने तपासणी केली जात आहे, अशी माहिती नागपूर महापालिकेचे नोडल वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय काळजी घ्यावी?

जलजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांनी महापालिकेकडून नळावाटे पुरवठा होणाऱ्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा, शुद्धीकरण न केलेल्या बोरवेल अथवा विहिरीच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करू नये, शिळे किंवा उघड्यावरचे अन्न खाऊ नये, अन्नपदार्थ झाकून ठेवावे, हातगाड्यावर उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ खाऊ नये, पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकडून थंड करून प्यावे, पिण्याचे पाणी दूषित आढळल्यास त्यामध्ये क्लोरीन गोळ्यांचा वापर करावा, एक क्लोरीनची गोळी २० लिटर पाण्यामध्ये टाकावी, पावसाळ्यात खाद्यपदार्थ उघडे न ठेवता झाकूनच ठेवावे, भांडी स्वच्छ ठेवावी, परिसर स्वच्छ ठेवावे, भेलपुरी- पाणीपुरीवाल्यांनी स्वच्छ पाण्याचा वापर करावा, आजाराची लक्षणे आढळताच तज्ज्ञ डॉक्टरांसह महापालिका वा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांकडून उपचार घ्यावा,, असे आवाहनही महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

हेही वाचा…३३ कोटी वृक्षलागवड प्रकरणात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना “क्लीन चिट”

२०२४ मध्ये आढळलेल्या रुग्णांची स्थिती

महिना अतिसार विषमज्वर कावीळ

जानेवारी ६३ ०१ १०

फेब्रुवारी ३९ ०३ ००
मार्च ६४ १८ ००

एप्रिल १०६ १७ ०१
मे १५० १४ ००

जून ११३ १४ ०३
जुलै ५२ २३ ००

एकूण ५८७ ९० १४