नागपूर : पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबविले. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून या ऑपरेशनला देशभरातून सामान्य नागरिकांचा पाठिंबा मिळाला. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध गटातून भारतीय सैन्याच्या शौर्याचे अभिमानास्पद गोडवे गायले. आता थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी याबाबत मोठे विधान केले आहे. नागपूर खंडपीठात कार्यरत न्या.अविनाश घरोटे यांनी त्यांच्या निवृत्तीच्या निरोप समारंभात भारतीय सैन्य दलाबाबत वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले न्या.घरोटे?

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासन तसेच हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे (एचसीबीए) न्यायमूर्ती घरोटे यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी भावना व्यक्त केल्या. न्या. अविनाश घरोटे मूळचे नागपूरचे असून, त्यांचे वडील गुणवंतराव घरोटे हे सुद्धा वकील होते. एलएलबी पदवी मिळविल्यानंतर त्यांनी १९८६ पासून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांना वकिली व्यवसायाचा ३३ वर्षांचा अनुभव आहे. दिवाणी प्रकरणांवर त्यांची विशेष पकड आहे. त्यांनी सर्वाधिक मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ व नागपूर जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय केला. नागपूर जिल्हा विधिज्ञ संघटनेचे माजी सचिव देखील राहिले आहे.

आपल्या निवृत्ती दिनी केलेल्या या भाषणाच्या सुरुवातीस त्यांनी सैन्य दलाच्या कारवाईचे समर्थन केले. ‘मी भारतीय सैन्य दलासोबत’ असल्याची भावना व्यक्त करीत आपल्या निवृत्ती सोहळ्याच्या भाषणाची सुरवात केली. त्यांच्या या कृती मुळे विधी क्षेत्रासह सर्वत्र कौतुकाचे भावना त्यांच्या प्रती व्यक्त केली जात आहे. न्या. घरोटे म्हणाले, मला मुळात विज्ञानात रस होता. विशेषतः खगोलशास्त्रात काही तरी करायचे होते. मात्र, माझ्या भाग्यात वकिली होती. सुरुवातीच्या काळात मला वडिलांखेरीज इतर अतिशय प्रसिद्ध व बुद्धिमान वकिलांचे मार्गदर्शन लाभले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मार्गदर्शनाचा मला विशेष लाभ झाला आहे. कोरोना काळात सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी काम करता आले, याचा मला विशेष आनंद आहे, असेही न्या. घरोटे यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सोहळ्याला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, नागपूर खंडपीठातील इतर न्यायमूर्ती, माजी न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे, न्यायालयाचे विधी अधिकारी, साहाय्यक सॉलिसिटर जनरल ॲड. नंदेश देशपांडे, मुख्य सरकारी वकील व वरिष्ठ अधिवक्ते देवेंद्र चौहान, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. पारिजात पांडे, एचसीबीएचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे, न्या. घरोटे यांचे कुटुंबीय व नातेवाईक तसेच विधी क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते.