नागपूर : कारागृहाच्या चिरेबंदी भिंतीआड जीवन जगत असलेल्या कैद्यांना मुलांची भेट घेता यावी म्हणून कारागृह प्रशासनाने ‘गळाभेट’ हा उपक्रम सुरु केला. बुधवारी सकाळी मध्यवर्ती कारागृहात असणाऱ्या आई-वडिलांची १९७ मुला-मुलींनी भेट घेतली.
सध्या कारागृहात असलेले कैदी भविष्यात चांगले नागरिक म्हणून समाजात परत जावे, त्यांना कुटुंबाची आणि कर्तव्याची जाणीव व्हावी, या उद्देशाने कारागृह प्रशासाने बंदिजन व त्यांच्या मुलांची गळाभेट घडवून आणली. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी १ सप्टेंबर १९६९ रोजी कारागृह विभागास ध्वज प्रदान केला होता. त्यादिवसापासून राज्यात सर्वत्र कारागृह विभागाचा ध्वजदिन साजरा करण्यात येतो. करोना काळात बंदिवानांना आपल्या मुलामुलींना भेटता आले नव्हते. मात्र, आता कारागृह विभागाच्या या गळाभेट उपक्रमामुळे अनेकांना त्यांच्या पालकांशी भेटता आले. या प्रत्यक्ष भेटीचा आनंद लहान मुलामुलींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. कित्येक महिन्यांनतर मुलांची भेट होणार, म्हणून बुधवारी सकाळपासूनच बंदिजन कारागृहात प्रतीक्षेत होते. सकाळी गळाभेट कार्यक्रमास सुरुवात झाली. अनेक बंदिजनांना हुंदके सांभाळत नव्हते. ‘बाबा, तुम्ही घरी कधी येणार…?’ या प्रश्नाने ते नि:शब्द होत होते. वडिलांची अगतिकता बघून मुलांच्याही डोळ्यात पाणी येत होते. कारागृह प्रशासनाने घेतलेल्या या कार्यक्रमाने आमच्यातील खरा माणूस जागा झाल्याच्या भावनाही अनेकांनी व्यक्त केल्या.
गळाभेट कार्यक्रम संपल्यानंतर परत जाताना पालक आणि पाल्यांचे डोळे पाणावले. अश्रूपूर्ण डोळ्यांनी एकमेकांना निरोप दिला. कारागृहातील बहुतांश बंदीवानांची संचित रजा किंवा अभिवचन रजा मंजूर न झाल्याने त्यांना आपल्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी जाता येत नाही. प्रत्यक्ष पाल्यांना भेटता न आल्याने कैदी कारागृहात मानसिकदृष्ट्या खचून जातात. त्यांच्या कुटुंबीयांची भेट व्हावी या उद्देशाने कारागृह प्रशासनाने १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गळाभेट घडवून आणली. या कार्यक्रमात १९७ मुलांनी प्रत्यक्ष कारागृहात आपल्या आई-वडिलांची ३० मिनिटे भेट घेतली.
कारागृह अधीक्षक वैभव आगे, अतिरिक्त अधीक्षक दीपा आगे, उपअधीक्षक श्रीधर काळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी आनंद पानसरे यांनी मुलांना शैक्षणिक व भेटीच्या अनुभवाबाबत मनोगत विचारले. कैद्यांनी कारागृहात कमावलेल्या पैशांतून मुलांना खाऊ घेऊन दिला. अपर पोलीस महासंचालक (कारागृह व सुधारसेवा) डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, पूर्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमासाठी प्रयास सामाजिक संस्थेचे धनपाल मेश्राम, मीना लाटकर, कृष्णा पाडवी यांनी विशेष सहकार्य केले. वरिष्ठ लिपिक राहुल बांबल, हवालदार विजय राघोर्ते, गुड्डी बाहेकर, सुभेदार रामदास भोंडे, हवालदार संजय गायकवाड, राजू हाते, संजय तलवारे, राजू मांढरे, राजू टेंभरे यांच्यासह कारागृह शिपाई व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.