एकत्रित तंत्रप्रणालीने कामे सोपी झाली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर मेट्रोसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘५ डी-बीम’ प्रणालीमुळे मेट्रोच्या कामाला गतीने पूर्ण करण्यात व्यवस्थापनाला यश येऊ लागले आहे. जगभरात प्रसिद्ध आणि भारतात प्रथमच अशा प्रणालीचा नागपूर मेट्रोसाठी वापर केला जात आहे.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निश्चित वेळेत प्रकल्प पूर्ण व्हावा, खर्चाची बचत आणि कामाच्या गुणवत्तेत वाढ ही उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून मेट्रो व्यवस्थापनाने सहा महिन्यांपूर्वी ५ डी-बीम प्रणालीचा अवलंब केला होता. सहा महिन्यात याचे फळ प्रकल्पाच्या कामाला गतीतून मिळाले आहे. बेंटले ही अमेरिकन कंपनी सॉफ्टवेअर पुरवठा करणार आहे. या कंपनीने मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेले वेगवेगळे सॉफ्टवेअर पुरविले. त्याचा एकत्रित वापर मेट्रो व्यवस्थापनाने केला.

मेट्रो प्रकल्प हा मेगा प्रोजेक्टमध्ये मोडतो. यासाठी एकाच वेळी वेगवेगळ्या पातळीवर कामे करावी लागतात. सामान्यपणे यासाठी ३ डी-बीम तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. महामेट्रोने ५ डी-बीम प्रणालीचा अवलंब केला आहे. प्रकल्पासाठी विविध प्रकारच्या इमारती आणि इतरही प्रकल्प उभारणीच्या तीन हजारावर डिझाईन्स तयार करायच्या होत्या. त्यानंतर निविदा काढण्यापासून प्रत्यक्ष बांधकाम आणि त्यावर देखरेख तसेच कामाची गुणवत्ता ही प्रक्रियाही पूर्ण करायची होती. ५ डी-बीम मुळे ही सर्व कामे निर्धारित वेळेत आणि गतीने पूर्ण करण्यात टीम मेट्रोला यश आले, असे दीक्षित यांनी सांगितले. नागपूर मेट्रोचे मुंबईत डाटा सेंटर उघडण्यात आले आहे. तेथे या प्रकल्पाशी संबंधित सर्व तांत्रिक  माहिती संग्रहित करून ठेवली जाते. अशाप्रकारच्या प्रकल्पासाठी ही माहिती भविष्यात उपयोगी पडू शकते, असे ते म्हणाले.

५ डी-बीममध्ये तंत्रज्ञान, नियोजन, प्रकल्प निर्माण खर्च आणि एकूण प्रकल्पाची उभारणी आदींचा समावेश होतो. या सर्व कामांसाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरसाठी चार रिव वेगळ्या कंपन्या नियुक्त करण्यात आल्या. त्यात अनुक्रमे बेंटले, डायनावेरा, सॅप आणि आरआयबी आदींचा समावेश आहे. बेंटले ही प्रमुख कंपनी आहे. त्याचे जागतिक मार्केटिंग विभागाचे प्रमुख स्टिव्ह कॉकरेल यांनी नागपुरात येऊन प्रकल्पाची पाहणी केली.

रशियन रुळ चार दिवसात

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी रशियन बनावटीचे लोखंडी रुळ वापरण्यात येणार असून ते रशियावरून भारतात (मुंबई पोर्ट) दाखल झाले आहे. तेथून ते चार ते पाच दिवसात नागपुरात आणले जातील. पहिल्या टप्प्यात जमिनीवरून धावणाऱ्या मेट्रोसाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे. मेट्रोच्या डेपोमध्ये भारतीय बनावटीचे रुळ वापरण्यात येणार आहे. मात्र, डेपोबाहेरील मार्गासाठी रशियन बनावटीचे रुळ वापरले जाणार आहे ते अधिक टणक आणि दीर्घकाळ चालणारे असते, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur metro uses 5d bim technology
First published on: 26-05-2017 at 01:51 IST