नागपूर : समाजसेवेची प्रेरणा ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मिळाली. महापालिका निवडणुकीमध्ये सासऱ्यांना उमेदवारी मिळणार होती. मात्र, त्यावेळी मला उमेदवारी मिळाल्याने ते काहीसे नाराज झाले. असे असले तरी पत्नी खंबीरपणे सोबत उभी होती. यातून राजकारणाचा प्रवास सुरू झाला, असे आमदार संदीप जोशी यांनी सांगितले. ५२ वर्षांपासून भाजपकडे असलेली पदवीधर मतदारसंघाची जागा आपण वाचवू शकलो नाही. तो पराभव जिव्हारी लागला होता. तेव्हा वाटले होते राजकारण सोडून द्यावे. पण सावरलो. चांगले कामे करत राहिलो. पण हेच क्षण आपल्याला अधिक मजबूत करतात, असा विश्वास आमदार संदीप जोशी यांनी व्यक्त केला.
जोशी यांनी आपल्या आयुष्याच्या वाटचालीतील संघर्ष, यश-अपयश, आठवणी आणि प्रेरणादायी अनुभव श्रोत्यांसमोर मांडले. विदर्भ हिंदी साहित्य संमेलनतर्फे आयोजित ‘संवाद’ या विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखक सागर खादीवाला यांनी त्यांची मुलाखत घेतली. मोर हिंदी भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीस उमेश शर्मा यांनी स्वागत केले. भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश व्यास यांनी आमदार जोशी यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. त्यानंतर जोशी यांनी आठवणींना उजाळा दिला.
संदीप जोशी यांनी आपल्या सुरुवातीच्या आयुष्याची आठवण करत सांगितले की, १९८५ मध्ये दहावी पास झालो. प्राध्यापक व्हायचे स्वप्न होते. पण घरात आई-बाबा शिक्षकी पेशात असल्यामुळे काहीतरी वेगळे करावे असे त्यांना वाटायचे. मग मी अन्य नोकरीचा पर्याय निवडला. जे. सी. अँड सन्स प्लायवुडमध्ये सर्व्हिस मॅनेजर आणि नंतर निप्पो बॅटरीजमध्ये नोकरी केली. पण १९९८ साली नोकरी सोडून राजकारणात उतरायचे ठरवले. पत्नीने माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिली, असेही ते म्हणाले.
कलाविश्वातली सुरुवात आणि सावरकरप्रेम
राजकीय क्षेत्रात येण्याआधी संदीप जोशी यांनी अभिनय क्षेत्रातही आपली चुणूक दाखवली. वयाच्या १९ व्या वर्षी प्रख्यात दिग्दर्शक राजदत्त यांच्या चित्रपटात काम केले. मराठीत गाजलेल्या ‘वजीर’ या चित्रपटाचे प्रख्यात दिग्दर्शक उज्ज्वल ठेंगडी यांनी ‘राजे शिवछत्रपती’ या नाटकात मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका दिली. मी त्यावेळी महापौर असल्याने प्रारंभी या भूमिकेला नकार दिला होता. मात्र, यावरच चित्रपट निघणार होता. त्यात माधुरी दीक्षित ह्या जिजाऊ यांची भूमिका करणार होत्या. मलाही त्या चित्रपटात ते घेणार होते. केवळ माधुरी दीक्षित राहणार या एकमेव कारणाने मी नाटकातली भूमिका प्रारंभी स्वीकारली असल्याचा एक मिश्कील किस्साही त्यांनी यावेळी सांगितला.