चंद्रपूर : भारताच्या सार्वभौमत्वासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाने केलेली कामगिरी देशवासीयांसाठी अभिमानास्पद ठरली. या अद्वितीय शौर्याला आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठीच आजची तिरंगा रॅली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. रविवारी आमदार मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ असा जयघोष करीत बल्लारपुर येथील काटा गेट येथून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई, बौद्ध बांधवांसोबतच हजारो नागरिक तिरंगा ध्वज घेवून सहभागी झाले होते.

काटा गेट येथून तिरंगा रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी आमदार मुनगंटीवार यांनी मार्गदर्शन केले. भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे. वीर जवानांना सॅलूट करण्यासाठी तथा सैनिकांच्या सन्मानासाठीच ही तिरंगा रॅली आहे. भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना बल्लारपुर येथील सैनिक शाळेतील शेकडो विद्यार्थी सैन्यात भरती होण्यास तयार होते, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

काटा गेट येथून सुरू झालेली ही तिरंगा रॅली नवीन बस स्थानक मार्गाने शहरात सर्वत्र फिरली. बल्लारपूर येथे यात्रेचा समारोप झाला. रॅलीत चंदनसिंग चंदेल, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, राजेंद्र गांधी, संध्या गुरनुले यांच्यासह विद्यार्थी, युवक, युवती, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक संस्था, विविध सामाजिक संघटना आणि सर्व राजकीय पक्ष, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.विविध धर्मगुरूंच्या उपस्थितीमुळे रॅलीत विविधतेत एकतेचे दर्शन घडले. देशासाठी लढणाऱ्या वीर जवानांना नमन करण्यासाठीच ही तिरंगा रॅली आहे, असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले. या रॅलीमुळे बल्लारपुरात देशभक्तीचे वातावरण तयार झाले होते. बल्लारपुरातील सर्वच संघटना या रॅलीत सहभागी झाल्याने रॅलीला भव्य स्वरूप प्राप्त झाले होते.

माजी सैनिक, धर्मगुरुंचा सत्कार

पांडुरंग हेमके, वीर पत्नी संगीताताई इंगळे, सहदेव रामटेके, माजी सैनिक विजय शेंडे, मनोज ठेंगणे, हवालदार वीर बहादुर सिंग, जगदीश सिंग, मनोज यादव, विश्वेश्वर सरोज, जन बहादुर सिंग सरोज, आदी माजी सैनिकांसह भंतेजी भागीरथ, अल्ताफ भाई, मनीष महाराज, सादिक जवेरी, सुनील पास्टर, दलजीत सिंह कलसी, आदी धर्मगुरुंचा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.