नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा- २०२४चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता मुख्य परीक्षा दिनांक २१ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचेही ‘एमपीएससी’ने जाहीर केले आहे. मात्र, मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्यास ‘एमपीएससी’ने मुदतवाढ दिली आहे. राज्यातील पूर परिस्थितीचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला असून आता उमेदवारांना २५ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

‘एमपीएससी’तर्फे १ जून रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. निकालाद्वारे मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा ‘एमपीएससी’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकूण २६ हजार ७४० उमेदवारांचा समावेश आहे. पूर्वपरीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्वपरीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी निश्चित केलेल्या कालावधीत अर्ज करणाऱ्या, तसेच परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.

आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.परीक्षेचा निकाल विविध न्यायालयांत, न्यायाधिकरणांत दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे. पूर्वपरीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाइल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येईल.

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने आवश्यक माहिती, तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्वपरीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील, असेही ‘एमपीएससी’ने पत्रकात नमूद केले.

थोडक्यात महत्त्वाचे

  • ‘एमपीएससी’तर्फे १ जून रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.
  • मुख्य परीक्षेचा अर्ज करण्यासाठी आता २५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
  • निकालाद्वारे मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा ‘एमपीएससी’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध.
  • यादीमध्ये एकूण २६ हजार ७४० उमेदवारांचा समावेश.
  • आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येणार.
  • परीक्षेचा निकाल विविध न्यायालयांत, न्यायाधिकरणांत दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध.
  • पूर्वपरीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाइल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येईल.
  • मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने आवश्यक माहिती, तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक.
  • पूर्वपरीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरिता स्वीकारार्ह.