नागपूर : नागपूर जिल्ह्यात काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगताना दिसून येत आहे. माजी प्रदेश सरचिटणीस मुजीब पठाण यांनी मोर्चा काढून काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांना बँक घोटाळाप्रकरणी शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार नागपूर जिल्हा सहकारी बँकेतील घोटाळाप्रकरणी दोषी ठरले आहेत. ते सध्या जामिनावर आहेत. नागपूर जिल्हा काँग्रेसवर त्यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या राजकीय प्रभावामुळे जिल्ह्यात नवीन नेतृत्व समोर येत नसल्याचे काँग्रेसमधील काही पदाधिकारी दबक्या आवाजात अनेक वर्षांपासून बोलत आहेत. लोकसभा, विधानसभा असो, की जिल्हा परिषद निवडणुका उमेदवार निवडीपासून तर राजकीय समीकरण जुळवून आणण्यात केदार यांचाच वरचष्मा दिसून आला आहे. त्यामुळे पक्षातील अनेक नेते, पदाधिकारी नाराज आहेत. परंतु कोणीही केदार यांना उघडपणे आव्हान दिले नव्हते. परंतु मुजीब पठाण यांना प्रदेश कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले.

बुटीबोरी औद्योगिक नगरी असल्याने सर्व राजकीय पक्षासाठी हे ठिकाण महत्त्वाचे आहे. येथे मुजीब पठाण प्रभाव राखून असल्याचे त्यांनी काढलेल्या मोर्चातून दिसून आले. या मोर्चात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि जनता सहभागी झाली होती. सुनील केदार यांच्या विरोधात नागपूर ग्रामीण कॉंग्रेसमध्ये असंतोष वाढत आहे, त्याचा प्रत्यय या मोर्चातून आला. मुजीब पठाण यांनी नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी दोषी ठरलेल्या केदार यांना शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

केदार यांच्याविरोधात नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसजणांनीच मोर्चा काढून अनेकांना आश्चर्यांचा धक्का दिला. काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस मुजीब पठाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसजण व शेतकऱ्यांनी बुटीबोरी पोलीस ठाण्यात तक्रार देत निवेदन दिले. हे निवेदन मुख्यमंत्री यांच्या नावे देण्यात आले आहे.

या निवेदनातून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यातील सर्व आरोपींवर जलदगतीने शिक्षेची अंमलबजावणी करावी, दोषींकडून ताडतीने वसुली करावी, गंभीर अशा आर्थिक गुन्ह्यात सहभागी व्यक्तींना कोणतेही राजकीय आश्रय किंवा पद मिळू नये, याची हमी सरकारने द्यावी तसेच बँकेचे पुनर्गठन करून तिचा कारभार पारदर्शक व शेतकरीहितासाठी पुन्हा उभा करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.