नागपूर: व्यक्तीगत कामासाठी घरासमोरील रस्त्यावर मंडप, शामियाना, कमानी उभारून सार्वजनिक वाहतुकीला अडथळा आणण्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक सातत्याने प्रयत्न करीत आहे. गेल्या १ जानेवारी ते ३० जून २०२५ या सहा महिन्यात ७ हजार ११८ जणांवर कारवाई करून ७९ लाख २३ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
नागपूर महापालिकेतर्फे स्वच्छ नागपूर, सुंदर व स्वस्थ साकारण्यासाठी विविध अभियान राबविले जात आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ नागपूर अभियान राबवण्याला प्राधान्य दिले जात आहे.
शहर स्वच्छ राहावे तसेच शहरातील वाहतुकीला कुठेही अडथळा येऊ नये यासाठी उपद्रव शोध पथकाद्वारे सातत्याने निगराणी राखली जात आहे. यासाठी विविध पथके तयार करून महापालिकेच्या नियमांचा तसेच सार्वजनिक स्वच्छेतेमध्ये अडथळा आणण्याचे काम करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाते. यात खासगी किंवा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी रस्त्यावर मंडप, शामियाने तसेच कमानी उभारून रस्ता बंद करण्याचे प्रकार सातत्याने होत असतात. या प्रकारामुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. यासंदर्भात सजग नागरिकांनी उपद्रव पथकाकडे तक्रार केल्यास कारवाई केली जाते.
धरमपेठ झोनमध्ये या प्रकरणी सर्वाधिक प्रकरणे उघडकीस आली असून या विभागात मागील सहा महिन्यात १ हजार २१२ जणांवर उपद्रव पथकाने कारवाई केली. यातून शहरात सर्वाधिक १७ लाख ८९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. या खालोखाल हनुमाननगर झोनमध्ये रस्ते अडविण्याच्या नियमबाह्य घटना घडल्या आहेत. या झोनमध्ये १ हजार १७४ जणांनी महानगरपालिकेच्या नियमांचे उल्लंघन केले या कारवाईतून ११ लाख ५९ हजार १०० रुपये दंड वसूल केला. नेहरूनगर झोनमध्ये या संदर्भात ५६३ जणांवर कारवाई करून ८ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
स्वच्छ नागपूर व सुंदर नागपूर या संकल्पनेच्या संदर्भात लोकांमध्ये अधिकाधिक जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने उपद्रव शोध पथकाद्वारे अभियान राबविण्यात येत आहे. यात लोकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्या व नागपूर शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने नवे पाऊल टाकण्याचा हा उपद्रव शोध पथकाचा प्रयत्न आहे.