नागपूर : नागपूर महानगरपालिकेत एकूण २४५ पदांची नियुक्ती प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता विविध १७४ पदांसाठी पुन्हा मेगा भरती घेण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आस्थापना विभागातर्फे विविध दहा संवर्गातील १७४ पदांची ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया येत्या २६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा असे, आवाहन महापालिकेद्वारे करण्यात आले आहे. जवळपास दोन दशकानंतर अशी मेगा भरती घेण्यात येत आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांची सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. कनिष्ठ लिपिक-६०, विधी सहायक-०६, कर संग्राहक-७४, ग्रंथालय सहायक-८, स्टेनोग्राफर-१०, लेखापाल/रोखपाल-१०, सिस्टीम ॲनॅलिस्ट-१०, हार्डवेअर इंजिनीअर-२, डेटा मॅनेजर-१, प्रोग्रामर-२ अशा एकूण १७४ पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिनांक २६ ऑगस्ट २०२५ ते ९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत https://nmcnagpur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक ९ सप्टेंबर २०२५ आहे. परीक्षेची सविस्तर जाहिरात दिनांक २२ ऑगस्ट रोजी मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा ही संगणक आधारित चाचणी पद्धतीने घेण्यात येईल. या भरतीसाठी कोणतेही अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार नाहीत. अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करणे बंधनकारक असल्याने याची दक्षता घेण्याचेही आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात, निवड प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक आहे. तांत्रिक मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक टीसीएस: ९५१३२५२०८८ आणि महापालिका ९१७५४१४८८० वर सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन वेळेत संपर्क करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. यापूर्वी नागपूर महानगरपालिकेने यावर्षी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (विद्युत), वृक्ष अधिकारी, नर्स परिचारीका) अशा एकूण ५ संवर्गाकरिता भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने यशस्वीरित्या पूर्ण केली.