विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र चूल मांडल्याने फेब्रुवारीत होऊ घातलेल्या नागपूर महापालिका निवडणुकीत आघाडी होणार नसल्याचे संकेत मिळाले असून दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.
महापालिका निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीशी कधी आघाडी तर कधी स्वबळावर निवडणूक लढवली आहे. २००२ मध्ये तीन सदस्यीय प्रभाग होता. त्यावेळी राष्ट्रवादीने आघाडी केली नाही. त्यावेळी राष्ट्रवादीला ११ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसकडे बहुमत होते. त्यानंतर २००७ मध्ये आघाडी झाली नाही. यावेळी राष्ट्रवादीची सदस्य संख्या ८ वर आली. २०१२ च्या निवडणुकीत दोन सदस्यीय प्रभाग होते. आघाडीने ही निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादीला सहा जागांवर विजय मिळाला. काँग्रसने राष्ट्रवादीसाठी २९ जागा सोडल्या होत्या. विधान परिषदेतील आघाडीतील बिघाडी बघता महापालिका २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आघाडी होण्याची शक्यता दिसत नाही.
राज्यात विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १९ नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्यात विदर्भातील भंडारा-गोंदिया आणि यवतमाळ या जागांचा समावेश आहे. गेल्या सरकारमध्ये एकत्र राहिलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या निवडणुकीत आघाडी केली नाही. मुंबई महापालिकेच्या निडणुकीच्या तोंडावर हमरी-तुमरीवर आलेल्या भाजप-शिवसेने मात्र युती केली आहे. यामुळे दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप-शिवसेना अशी तिरंगी लढत होत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपाठोपाठ विदर्भात नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्यानंतर नागपूर महापालिका निवडणूक होणार आहे.
नेत्यांची वक्तव्यांमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील दरी आणखी रुंदावले, अशी चिन्हे आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत हे दोन्ही समोरासमोर आल्याने त्यापाठोपाठ होणाऱ्या नगरपंचायत, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीवर त्यांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भूमिका बघून स्थानिक नेते महापालिका स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याच्या तयारीला लागले आहेत. दोन्ही पक्षाने शहरातील सर्व ३८ प्रभागातील १५१ उमेदवारासाठी अर्ज मागवले आहेत. राष्ट्रवादीची शहरातील ताकद मुळताच कमी आहे. राष्ट्रवादीचे जे काही नगरसेवक आहेत. ते स्वबळावर निवडून आलेले आहेत. पक्षाच्या नावावर मते मिळवल्याचे उदाहरण शोधून सापडणार नाही, अशी अवस्था आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील १० ते १२ जागांवर दमदार उमेदवार समोरासमोर आल्यास आपसूकच त्याचा लाभ भाजपला होणार आहे.
विदर्भात राष्ट्रवादी वाढत नसल्याने नगरपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका आदी निवडणुकांमध्ये आघाडीचा निर्णय जिल्हास्तरावर घेण्याची मुभा देण्यात द्यावी, अशी मागणी प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समक्ष केली होती, हे येथे उल्लेखनीय.
कार्यकर्त्यांना आघाडी नको – मुत्तेमवार
महापालिका निवडणुकीत आघाडी नको, अशी भावना २६ ऑक्टोबरच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. शहर काँग्रेसने तसा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडे पाठवला आहे. आघाडी करायची की नाही हा निर्णय प्रदेश काँग्रेस घेईल, असे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी सांगून यापूर्वी राष्ट्रवादीचे नागपूरचे प्रभारी प्रफुल्ल पटेल यांनी आघाडी केल्यामुळे हरलो, असे वक्तव्य केल्याकडेही लक्ष वेधले.