नागपूर: ॲक्युट एन्सेलफायटीस सिंड्रोम (एईएस) या मेंदूज्वराच्या आजाराचा शहरात शिरकाव झाला आहे. याआजाराचे एकूण आठ रुग्ण आढळले असून त्यापैकी पाच मध्यप्रदेशातील दोन नागपूर शहरातील तर एक नागपूर ग्रामीणमधील आहे.

मेंदूच्या आजारावर वेळेत उपचार केले नाही तर जीवाला धोका उद्भवू शकतो, त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. एईएसचे रुग्ण आढळताच महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी यांनी तातडीने पावले उचलली. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयााना त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये एईएस आजाराचे लक्षणे आढळून आल्यास तातडीने महापालिकेला कळवण्यास सांगण्यात आले आहे.

काय आहे एईएस ?

ॲक्युट एन्सेलफायटीस सिंड्रोम (एईएस) म्हणजे मेंदूला होणारी तीव्र स्वरुपाची जळजळ किंवा मेंदूला सूज येणे. अचानक तीव्र ताप येणे, मानसिक आरोग्यावर परिणाम, गोंधळणे, चक्कर येणे, झटके येणे किंवा बेशुदध पडणे. काही वेळा रुग्णाला चालता येत नाही केवा बोलतांना अडचणी येतात. त्यामुळे वरील प्रकारे काही लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित डॉक्टरकडे जावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

मध्यप्रदेशातील रुग्ण अधिक

नागपूरमध्ये सापडलेल्या आठ रुग्णांपैकी शेजारच्या मध्यप्रदेशातील पाच रुग्णांचा समावेश आहे. नागपूर हे वैद्यकीय उपचाराचे हब झाल्याने मोठ्या प्रमाणात शेजारच्या मध्यप्रदेश, छत्तीसगडचे रुग्ण नागपूरमध्ये येतात. एम्स, मेडिकल, मेयो मध्ये सरकारी योजनांमधून सवलतीच्या दरात उपचार होत असल्याने शेजारच्या राज्यातून येणाऱ्या गरीब रुग्णांची संख्या वाढली आहे. नागपूरमध्येही दोन व नागपूर ग्रामीणमध्ये एक रुग्ण सापडला आहे. ही संख्या वाढू नये यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहे.