नागपूर : शहरातील हत्याकांडाची मालिका अजुनही सुरुच असून गेल्या तीन दिवसांत तिसरे हत्याकांड उपराधनीत उघडकीस आले. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ५ मित्रांंनी एका युवकाचा चाकूने भोसकून खून केला. हे हत्याकांड शनिवारी दुपारी तीन वाजता पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंद्रनगरात उघडकीस आले.

हर्ष राजू शेंडे (२२, हिवरीनगर, नंदनवन) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. दुर्गेश रारोकार (२५, भांडेवाडी) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. गुरुवारीच बीट्स गँगचा सदस्य अमोल बहादूरे (३२, राणी भोसलेनगर, सक्करदरा) आणि गुंड अमोल वंजारी (२२, वाठोडा) या दोघांचा खून झाला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये अभिषेक हुमणे या युवकाचा वाढदिवसाच्या डीजेमध्ये नाचण्यावरुन खून करण्यात आला होता. हा खून हर्ष शेंडे आणि अन्य चार मित्रांनी केला होता. त्यावेळी हर्ष हा १७ वर्षांचा होता. अभिषेकचा खून केल्यामुळे त्याचे मित्र दुर्गेश रारोकर आणि अन्य चार मित्र चिडलेले होते. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दुर्गेशने तयारी केली. हर्ष हा नेहमी चाकू आणि गुप्ती सोबत ठेवत होता. त्यामुळे त्याच्यावर अचानक हल्ला करणे गरजेचे असल्याचे त्यांनी हेरले. शनिवारी दुपारी तीन वाजता हर्ष शेंडे हा चंद्रनगर चौकात उभा होता. दुर्गेशने आपल्या चारही मित्रांना बोलावले. पाचही जणांनी हर्षला हेरले. त्यांनी चाकू आणि तलवारीने भोसकून हर्षचा भरचौकात खून केला आणि पळ काढला. हर्षचा खून होत असताना एकाही नागरिकाने मदतीसाठी धाव घेतली नाही. या प्रकरणी पारडी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करुन काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हत्याकांड सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद

आरोपींनी दहशत निर्माण करण्यासाठी हर्षचा भरचौकात खून करण्याचे ठरविले होते. कटानुसार हर्षला चौकात पाच जणांनी घेरुन चाकू-तलवारीने भोसकून खून केला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. सायंकाळपर्यंत हत्याकांडाचे फुटेज समाजमाध्यमावर प्रसारित झाले. त्यामुळे अनेकांनी हे हत्याकांड बघितल्याची चर्चा आहे.