नागपूर : मध्य प्रदेशातील पचमढी येथील नागद्वार यात्रेसाठी महाराष्ट्रातील भाविकांची एसटी बसने वाहतूकीस परवानगी मिळाली नाही. त्यामुळे यात्रेच्या पहिल्या दिवशी (१९ जुलै रोजी) महाराष्ट्रातील नागपूरसह इतर भागातून तेथे विशेष एसटी बस तेथे जाणार नाही. त्यामुळे भाविकांचा हिरमोड होणार आहे. दरम्यान भाजप नेत्यांकडून परवानगी मिळणार असल्याचा दावा केला गेला होता. त्यामुळे या नेत्यांच्या दाव्यावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्रत्येक वर्षी एसटी महामंडळाच्या नागपूरसह विदर्भाच्या विविध भागातून मध्य प्रदेशच्या नागद्वार यात्रेसाठी विशेष बस चालवल्या जातात. तेथे विदर्भाहून लाखोच्या संख्येत भाविक जात असल्याने खासगी ट्रॅव्हल्सकडून लुट होऊ नये म्हणून ही सोय केली जाते. दरम्यान यंदाही एसटीकडून परवान्यासाठी अर्ज केला गेला होता. त्यासाठी सात लाखाहून अधिकची रक्कम तेथील परिवहन कार्यालयाकडे जमाही केली गेली होती. परंतु पन्नास आसन क्षमतेहून अधिकच्या बसेसलाच परवानगी देता येत नसल्याच्या नियमावर बोट ठेवत एसटीला परवाना नकारला गेला.

दरम्यान एसटीकडे पन्नास आसण क्षमतेच्या बस नसून ४४ आसण क्षमतेच्याच बस आहेत. दुसरीकडे मध्य प्रदेशच्या कमी आसन क्षमतेच्या बसेस मात्र रोज नागपुरात येत असल्याचे निरीक्षण येथील प्रवाश्यांकडून नोंदवले जातात. त्यातच हा प्रकार लोकसत्ताने पुढे आणल्यावर बातमीची दखल घेत विधान परिषदेतही आमदार अभिजित वंजारी यांनी शासनाच्या निदर्शनात हा मुद्दा आणला. तर दुसरीकडे आमदार प्रवीण दटके यांनी हा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला. त्यानंतर फडणवीसांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी भ्रमनध्वनीवर चर्चा केली. त्यामुळे परवाना मिळणार असल्याचा दावाही दटके यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला होता. परंतु यात्रेच्या पहिल्याच दिवशी परवाना नसल्याने एसटी बसची वाहतूक भाविक करू शकणार नाही. परंतु या मुद्यावर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची शनिवारी पून्हा मध्य प्रदेशातील परिवहन अधिकाऱ्यांसी चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे त्यात काय निर्णय होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फक्त एकच नियमित बस धावणार

एसटी महामंडळाची पचमढीसाठी रोज सकाळी एक बस पचमढीला जात असून तेथून रोज सकाळी एक बस नागपूरला येते. ही बसही ४४ आसन क्षमतेची आहे. नेहमीप्रमाने ही एकच बस यात्रेच्या पहिल्या दिवशी पचमढीला जाऊ शकणार असल्याची माहिती नाव न टाकण्याच्या अटीवर एका एसटीच्या अधिकाऱ्याने दिली.