नागपूर : डिजिटल युगातील मुलं, मुली जास्तीत जास्त वेळ आभासी जगत असल्याचे परिणाम मुले आणि पालक यांच्या संबंधावर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यातील संवाद कमी झाला आहे. त्यामुळे अनेक कुटूंबात मोठी समस्या निर्माण झाली आहे. नागपुरातील असाच एक प्रकार घडला.
पालक आणि पल्यामध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब, टीव्ही बघण्यावरून विसंवाद होत आहे. ही मुलं एवढी संवेदनशील आहेत की भाजी, कपडे, शूज यावरून पालकांशी वाद घालू लागल्याचे अभ्यासक सांगतात. नागपुरात तर न आवडणारी भेंडीची भाजी आईने केल्याने एका मुलाने चक्क घर सोडले आणि रेल्वे गाडीने दिल्लीला पळून गेल्याची घटना घडली आहे.
कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. एक १७ वर्षीय मुलगा चक्क भेंडीची भाजी आवडत नसल्याने आईशी वाद घालून घरातून निघून गेला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने त्याचा शोध घेत परत आणले.
निलेश (बदललेले नाव) बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली असून पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेणार आहे. घरात जेवणातील बऱ्याच भाज्या त्याच्या नावडत्या आहेत. त्यात भेंडीची भाजी केल्यावर दुसरी भाजी न केल्याने अनेकदा आईशी त्याचा वाद होत होता. त्यामुळे जेव्हाही भेंडीची भाजी केली की त्या दिवशी सुजय घरी जेवण करीत नसे. १० जुलैला त्याच्या आईने घरी भेंडीची भाजी केली. सायंकाळी घरी आल्यावर त्याने यावरून ४९ वर्षीय आईशी वाद घातला. अन् मग आईनेही त्याला सुनावले. दरम्यान त्याचा राग मनात धरून नीलेश १० जुलैला रात्री अकरा वाजताच्या सुमारास घरातून निघून गेला. यानंतर त्याने थेट रेल्वेस्टेशन गाठून रेल्वेमध्ये बसून दिल्ली गाठली. सकाळी घरच्यांनी तो दिसत नसल्याने बेपत्ता होण्याची तक्रार कोतवाली पोलिसांना दिली. त्याचा तपास करण्यासाठी सर्व यंत्रणा कामी लागली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या ललिता तोडासे यांच्या पथकाने सीसीटीव्हीसह तांत्रिक तपास केल्यावर तो दिल्लीला असल्याची माहिती कळाली. यावेळी त्याच्या दिल्लीच्या मित्रांशी संपर्क करीत, त्यांच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू केला. तो सापडताच, त्याची समजूत काढून त्याला विमानाने नागपुरात पाठविले. शनिवारी सकाळी तो नागपुरात आल्यावर त्याचे समुपदेशन करीत, त्याला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले.
नागपुरातून दिल्लीला गेल्यावर निलेशने एक रात्र तेथील दर्गाजवळ काढली. तिथेच मिळालेल्या जेवणावर त्याने भूक भागविली. त्यामुळे कदाचित घरापासून दूर राहिल्यावर त्याला घरातील जेवणाचेही महत्व कळले असेल.