नागपूर : विदर्भात वाघ आणि पुण्या-मुंबईत बिबट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कधी शहराच्या जवळ, तर कधी शहरात बिबट्यांची घुसखोरी वाढतच चालली आहे. आता हा संघर्ष जंगल आणि गाव यापुरता मर्यादित नाही, तर हा संघर्ष जंगल आणि शहर इथपर्यंत येऊन पोहचला आहे. सोमवारी चक्क पुणे विमानतळावर बिबट्याने घुसखोरी केली आणि प्रवाश्यांमध्ये एकच धावपळ उडाली. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी एकदा नाही तर दोनदा बिबट्या दिसल्याने प्रवाशांमध्ये आणि विमानतळाशेजारी राहणाऱ्या स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सोमवारी सकाळच्या वेळी तर बिबट दिसलाच पण रात्रीदेखील बिबट्याने दर्शन दिल्याने प्रशासन आणि वनविभाग सतर्क झाला आहे. बिबट्याचा शोध घेतळ जात आहे. हा बिबट्या नवीन टर्मिनल पासून अवघ्या ८०० मीटर अंतरावर आल्याने प्रवाशांची भीतीने गाळण उडाली. स्थानिक नागरिकांच्या भ्रमणध्वनीवर हा व्हिडिओ सामाईक झाला.
विमानतळावर सोमवारी बिबट्या आला होता. नेमके कुठे जायचे होते त्याला ते समजले नाही, कदाचित पैसे नसावेत म्हणून परत गेला, अशीही कमेंट त्यावर कुणी केली. तर काही नागरिकांनी माझ घर शोधू कुठे ? असं तर वाटत नसावं त्याला ! अशीही कमेंट केली. हा व्हिडिओ समाजमाध्यमावर सामाईक होताच त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील उमटल्या. रात्रीच्या वेळी सदर ठिकाणी दोन सापळ्याचे पिंजरे बसवण्यात आले आहेत. विमानतळाचा काही भाग मोकळा आहे आणि डोंगर, झाडी आहे. तिथून बिबट आला असावा, असाही एक अंदाज आहे.
सोमवारी चक्क पुणे विमानतळावर बिबट्याने घुसखोरी केली आणि प्रवाशांमध्ये एकच धावपळ उडाली. बिबट्या नवीन टर्मिनल पासून अवघ्या ८०० मीटर अंतरावर आल्याने प्रवाशांची भीतीने गाळण उडाली. स्थानिक नागरिकांच्या भ्रमणध्वनीवर हा व्हिडिओ सामाईक झाला. pic.twitter.com/MLaHmDUvE9
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— LoksattaLive (@LoksattaLive) April 29, 2025
पुण्याभोवती डोंगर असल्याने अनेक भागात बिबट्या कधी कधी येतो. जुन्नर, आंबेगाव, शिरूर, मंचर या भागात बिबट्यांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे ते पसरत आहेत. पुण्यात मध्यवर्ती भागात अजून तरी बिबट आलेले नाहीत. मात्र, भविष्यात ते येणार नाहीत असेही नाही. या घटनेने ते सिध्द केले आहे. मात्र, विमानतळावर बिबट्याचा शिरकाव ही भविष्यात नक्कीच धोक्याची घंटा आहे. दरम्यान, वनखात्याने याठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले असून त्यामाध्यमातून बिबट्यावर लक्ष ठेवले जात आहे. मंगळवारी सकाळी, श्वान पथकाचा वापर करून बिबट्या कोणत्या भागात सर्वाधिक सक्रिय आहे हे ओळखण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, या घटनेचा विमान सेवांवर कोणताही परिणाम झालेला नाही.