नागपूर : मुळची राहणार मध्य प्रदेशातील. रोजगाराच्या शोधात मुंबईत पोचली. तेथील डान्सबारमध्ये नृत्य करून उदरनिर्वाह सुरू झाला. अशातच एका उच्चभ्रू कुटुंबातील पुरुषाची तिच्यावर नजर पडली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांनी लग्नही केले. सुखी संसार सुरू झाला. दोन मुलेही झाली. पण अचानक तिच्या नशीबाला दृष्ट लागली आणि पाहता पाहता ती संसार मोडून थेट गंगाजमनातल्या वेश्यावस्तीत पोचली. पोटाची खळगी भरणेही दुरापास्त झाले. इथे पुन्हा एका मुस्लिम तरुणाच्या संपर्कात आली आणि त्याने तिला थेट देहव्यवसायावर जुंपले.
यशोधरानगर पोलिस हद्दीतील भिलगाव येथील ओयो हॉटेलमधील देहव्यापाऱ्याच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग पथकाने टाकलेल्या छाप्यात एका महिलेची सुटका करण्यात आली. त्या महिलेने पोलिसांना कथन केलेल्या कहाणीवरून महिलेच्या संघर्षाचा उलगडा झाला.
हा देहव्यवसाय अड्डा चालवणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यापैकी एक अल्पवयीन आहे. भिलगाव येथील वॉर्ड क्रमांक दोन मधल्या घर क्रमांक ४० येथे एम. आर. हॉटेल ओयोच्या आडून हा देहव्यवसाय अड्डा चालवला जात होता. त्याची कुणकूण लागल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. महिला रुममध्ये पोचताच पथकाने छापा टाकत मनिषपाल सुदर्शन राजपूत (४९, अग्रसेननगर, भिलगाव), सिमा रानी मनिषपालसिंग राजपूत (५०) आणि एक अल्पयवीन मुलाला ताब्यात घेतले. यातला सोनू ऊर्फ सय्यद अली फरार झाला.
हॉटेलमधून पोलिसांनी ज्या पीडित महिलेची सुटका केली, तिने पोलिसांना सांगितलेली कथा शहारे आणणारी आहे. पोलिसांनी सुटका केलेली महिला पूर्वी मुंबईतल्या एका बारमध्ये डान्सर होती. १८ वर्षांपूर्वी मुंबईतील एका चांगल्या घरातील तरुणाने लग्न करून तिला या व्यवसायातून बाहेर काढले. या दोघांना दोन मुले देखील झाली. मात्र नंतरच्या काळात दोघांमध्ये खटके उडू लागल्यानंतर तरुणाने या महिलेला सोडून दिले. तिने सांगितलेल्या माहितीनुसार तिचा एक मुलगा मुंबईतल्याच एका बारमध्ये बार टेंडर म्हणून काम करतो. तर एक मुलगा तिच्यासोबतच नागपुरात आला आहे.
महिलेची एक नातेवाईक गंगाजमुनात राहत असल्याने या तरुणाने तिच्याशी संपर्क साधला. मात्र इथेही देहव्यवसाय करणे अवघड झाल्याचे सांगत तिने हात झटकले. अखेर उदरनिर्वाह करणे कठीण झाल्यानंतर एका मुस्लिम तरुणाने तिला पुन्हा देहव्यवसायाला जुंपले. ओयोच्या माध्यमातून रुम भाड्याने घेऊन पैसे कमावले जाऊ शकतात, असे आमिष दाखवत त्याने या महिलेला देहव्यवसासायत जुंपले.