नागपूर : राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्र्यांचे गृहक्षेत्र असलेल्या नागपूरमध्ये पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेचा मोठा गाजावाजा केला. छापे, अटकेचे फोटो, प्रेस नोट प्रसिद्ध करून झाले. पण प्रत्यक्षात गांजाच्या नावाखाली आरोग्यासाठी विशेषत: मेंदूला घातक मेफेडरोन (एमडी)सारख्या अंमली पदार्थांचा खुलेआम व्यापार सुरू आहे. विशेष म्हणजे हा सर्व व्यवहार एन.डी. पी. एस. पथक आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या संरक्षणात सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळत असलेल्या खात्रीलायक माहितीनुसार महिन्याच्या अखेरीस २० ते ३१ तारखेदरम्यान ‘हप्त्याचं सत्र’ सुरू होते. एनडीपीएस पथकातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तस्करांकडून लाखोंचा हप्ता पुरवला जातो. त्यामुळे त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, उलट महिनाभर छुप्या गांजाच्या आडून कारवाई करीत एमडी ड्रग्सचा गुप्त मार्गाने बाजार मोकळा ठेवला जातो.
गांजाचे दुकान दाखवून प्रत्यक्षात एमडी ड्रग्सची विक्री सुरू असताना पोलिस प्रशासन मात्र डोळेझाक करते. एमडी हा मेंदूवर घातक परिणाम करणारा अंमली पदार्थ आहे. शेकडो तरुणांचे आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. वास्तवात पोलीसच तस्करांना मार्ग मोकळा करून देत तरुणांना व्यसनांच्या दलदलीत लोटत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.
एनडीपीएस कायदा – केवळ नावापुरता?
एनडीपीएस (नारकोटिक ड्रग्स आणि साइकोट्रोपिक पदार्थ) कायदा अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाईसाठी आहे. पण नागपूरमध्ये केवळ हप्ते वसुल करण्यासाठी त्याचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीपीएस पथकातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात एक हेड कॉन्स्टेबल आणि शिपाई दर महिन्याला ठराविक हप्ते गोळा करतात. ही रक्कम दोघे कर्मचारी वरिष्ठ निरीक्षकाकडे जमा करतात. या रककेतील वाटणी देखील ठरलेली आहे. पथकातील प्रत्येकापर्यंत ही रक्कम नियोजितरित्या पोचवली जाते. महिन्याच्या ठराविक दिवशी हप्ते दिल्यानंतर तस्करांचा बिनबोभाट रान मोकळे केले जाते. हप्त्याची रक्कम कमी करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित पोलिस कर्मचार्याची तात्काळ बदली केली जाते. त्यामुळे हप्ता वसुली करणारे हे झारितील शुक्राचार्य कोण यावरून आता पोलीस दलात चर्चा रंगली आहे.
चौकशी केल्यावर कारवाई -माकणीकर
एनडीपीएस पथकातले अधिकारीच जर मिशनला गालबोट लावत असतील, तर निश्चितपणे त्याची चौकशी केली जाईल. काद्याच्या आडून होणारा कुठलाही अनुचित प्रकार सहन केला जाणार नाही. हे कोण करत आहे, याची माहिती घेऊन चौकशी अंती दोषींवर कारवाई होईल, असे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा (शोध) राहूल माकणीकर, यांनी सांगितले