नागपूर : व्यापाऱ्याच्या घरी साफसफाईचे काम करताना घरातल्या महिलेची नजर चुकवून कपाटातली हिऱ्याची अंगठी, सोन्या चांदीचे २१ लाखांचे दागीने आणि रोख रक्कम लंपास करणारा नोकर राजा मंटू चौधरी (४५) याला गुन्हे शाखेच्या पथकाने पश्चिम बंगालमधल्या २४ परगना जिल्ह्यातील सोडपूर येथून अटक केली. पोलिसांनी या नोकराकडून चोरलेले १८ लाखांचे दागाने जप्त केले आहेत.

गणेशपेठ पोलीस हद्दीत गितांजली चौकातील सारडा निकेतन संकुलात दहा दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. संकुलातील रहिवासी रितू अजितकुमार सारडा यांच्या घरात राजा चौधरी याने ही धाडसी चोरी केली होती. राजा हा गेल्या तीन महिन्यांपासून सारडा यांच्या घरात साफसफाईची कामे करत होता. सारडा यांनी त्याला घरातल्या वरच्या माळ्यावरची खोली राहण्यासाठी दिली होती. दरम्यान त्याने चांगली वर्तणूक करीत घरातल्या लोकांचा विश्वासही संपादन केला. त्यामुळे सारडा कुटुंबाकडून त्याला स्वातंत्र्य मिळत होते.

काही दिवसांपूर्वी रितू सारडा या नवी दिल्ली येथे राहणाऱ्या मुलीकडे जाणार होत्या. त्यामुळे त्यांनी बँकेतल्या तिजोरीत ठेवलेले दागीने घरी आणले होते. याचाच गैरफायदा घेत राजाने सारडा यांची नजर चुकवून सारडा यांच्या घरातील कपाटात ठेवलेली हिऱ्याची अंगठी, सोन्या- चांदिचे दागाने आणि रोख रकमेची चोरी केली. या मधल्या काळात राजाने गावाकडे घरी जायचे असल्याचे सांगत पळ काढला. दरम्यान अजितकुमार सारडा यांनी पत्नी रितूकडे कपाटात ठेवलेली रोख रक्कम मागितली. रितू यांनी कपाट उघडले असता आतले सोन्याचे दागीने चोरीला गेल्याचे त्यांना दिसले.

सारडा यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर चोरट्याचा शोध घेताना पोलिसांना नोकराने दिलेली ओळख बनावट असल्याचे आढळले. राजा चौधरीने आपले नाव राज चक्रवर्ती असल्याचे सांगितले होते. त्या आधारे तांत्रिक तपास करताना पोलिसांना तो चक्रवर्ती नसून चौधरी असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधून काढत राजा चौधरीला पश्चिम बंगालमधल्या २४ परगाना जिल्ह्यातील सोडपूर येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी हिसका दाखवताच राजाने चोरीची कबूली दिली. त्याच्याकडून गुन्हे शाखेने चोरलेल्या दागीन्यांपैकी हिऱ्याच्या अंगठीसह १८ लाखांचे दागाने आणि ३ भ्रमणदूरध्वनी जप्त केले.