राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांमधील पदव्युत्तर प्रवेशासाठी असलेली केंद्रीय पद्धत बंद करून महाविद्यालयांना भ्रष्टाचारासाठी रान मोकळे करून दिल्याचा आरोप होत असतानाच आता विद्यापीठाच्या विभागांमधील पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. या विरोधाभासी निर्णयामुळे प्रशासनावर अनेक शंका उपस्थित केली जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पदव्युत्तर प्रवेशाच्या नावावर महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याच्या तक्रारी असल्याने माजी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी त्यांच्या काळात केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या टक्केवारीनुसार नामवंत महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता आला. तसेच प्रवेशासाठी होत असलेल्या भ्रष्टाचारावर आळा घालण्यात आला होता. मात्र, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी पदभार सांभाळताच संलग्नित महाविद्यालयांच्या दबावात निर्णय घ्यायला सुरुवात केल्याचे चित्र आहे. प्रवेशाची केंद्रीय पद्धत बंद करून यंदाही खासगी महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आर्थिक लूट करण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे.

महाविद्यालय आणि विद्यापीठासाठी वेगळा निकष कसा? –

विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेतील पदवी अंतिम वर्षाच्या बहुतांश अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले. त्यामुळे विद्यापीठाने पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून, यावर्षी महाविद्यालयीन स्तरावरच ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. सर्वत्र ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू असताना विद्यापीठाने महाविद्यालयांमधील पदव्युत्तर प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया बंद केली, तर दुसरीकडे विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरातील पदव्युत्तर विभागातील प्रवेश हे प्रवेशपूर्व परीक्षेच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयांसाठी वेगळा निकष आणि विद्यापीठासाठी वेगळा निकष कसा, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

आपल्याच परीक्षा पद्धतीवर विश्वास नाही? –

विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा या विद्यापीठाने दिलेल्या प्रश्नपत्रिकांनुसार घेण्यात आल्या. मात्र, यामध्ये उणिवा असल्याने त्याचा लाभ घेत कधी नव्हे ते निकालाने उच्चांक गाठला आहे. त्यातच विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागामध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी गर्दी करीत आहेत. परीक्षेतील गैरप्रकारामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून विद्यापीठ प्रवेश पूर्व परीक्षा घेत असल्याची चर्चा आहे. मात्र, यामुळे विद्यापीठाला आपल्याच परीक्षा पद्धतीवर विश्वास राहिला नाही का, असा प्रश्न समोर येत आहे.

विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण –

महाविद्यालये आणि विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागामधील प्रवेशाची प्रक्रिया भिन्न राहणार असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार आहे. शिवाय ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या विभागात प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा की नाही, असा प्रश्न आहे. तर विद्यापीठाच्या विभागात प्रवेश न मिळाल्यास त्यांची महाविद्यालयांतील प्रवेशाची संधी हुकणार का, अशा संभ्रमात विद्यार्थी आहेत.

… म्हणजेच विद्यार्थ्यांना भ्रष्टाचाराची शिकार होण्यासाठी मोकळे सोडणे –

“पदव्युत्तर प्रवेशाच्या नावावर विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याच्या घटना आधीही समोर आल्या आहेत. यापासून काहीही धडा न घेता या वर्षीसुद्धा केंद्रीय प्रवेश पद्धतीने प्रवेश न घेणे म्हणजेच विद्यार्थ्यांना भ्रष्टाचाराची शिकार होण्यासाठी मोकळे सोडणे होय. दुसरीकडे विद्यापीठ पदव्युत्तर विभागात प्रवेश परीक्षा घेऊन गुणवत्तेनुसार प्रवेश घेण्याचा निर्णय योग्य असला, तरी ही पद्धत केवळ विद्यापीठाच्या विभागांसाठीच का, असा प्रश्न उभा राहतो.” असं विद्यार्थी कार्यकर्ता वैभव बावनकर याने सांगितले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur post graduate admission process in doubt contradictory decision of university administration msr
First published on: 26-07-2022 at 14:35 IST