नागपूर: दरवर्षी पावसाळ्यात एकदा तरी नागपूर शहर पाण्याखाली येते. यंदा ८ जुलैला हे घडले. पोलीस ठाण्यापासून रेल्वे स्थानकापर्यंत, विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गापासून मेट्रोस्थानकावर जाणाऱ्या मार्गावर पाणीच पाणी असल्याचे चित्र बुधवारी नागपूरकरांनी अनुभवले. प्रगत शहर म्हणून नुसताच गवगवा होणाऱ्या या शहराची पायाभूत सुविधांची पोलखोल करणारी ही बाब आहे.
तीन दिवसाच्या पावसाने नागपुरात दाणादाण उडाली. २३ प्रमुख रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. ५० वस्त्यांसह रेल्वे स्थानक, सोनेगाव पोलीस ठाण्यात पाणी शिरले. शहराच्या विविध भागात पुरात अडकलेल्या ४७ नागरिकांना महापालिकेच्या बचाव पथकाने सुरक्षित स्थळी हलवले. रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने शहरातील २३ रस्ते बुडाले. विमानतळाकडे जाणारा मार्ग पूर्णपणे पाण्याखाली होता. मुख्य रेल्वे स्थानकातही पाणी शिरले. फलाट क्रमांक एक व दोनवर प्रवाशांना पाण्यातून वाट काढत जावे लागत होते.
शहराच्या सीमावर्ती भागात म्हणजे हुडकेश्वर, नरसाळा, भरतवाडा, पुणापूरमध्ये पुरात अडकलेल्या एकूण ४७ लोकांना बचाव पथकाने सुरक्षित स्थळी हलवले. कॅनल रोडवरील सेवासदन शाळेचे जनरेटर बाजूने वाहणाऱ्या नागनदीत वाहून गेले. रामनगर परिसरातील हिल रोड ते पांढराबोडीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला. पिपळा नाल्याला पूर आल्याने पिपळा, हुडकेश्वर भागात ४० घरे पाण्याखाली गेली. प्रशासनाने हुडकेश्वरमधून आणि वीरव गावातून चार नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.
अनेक रस्त्यांवरील वाहतूक वळवली
नागपूरचा प्रमुख मार्ग मानल्या जाणाऱ्या रिंग रोडवरील पडोळे चौकापासून सुमारे पाऊण किलोमीटर अंतरापर्यंत रस्ता पूर्णपणे जलमय झाल्यामुळे वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवावी लागली. पडोळे चौक ते राधे मंगलम कार्यालय दरम्यान रिंग रोडची एक बाजू पूर्णपणे पाण्याखाली आली.
पिवळी नदीच्या काठावरील वस्त्यामंध्ये पाणी
नवकन्या नगर, भरतवाडा, येथील पिवळी नदीच्या काठावरील घरात अडकलेल्या दोन कुटुंबातील १४ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. धनगौरी नगर, पवारी, पूनापूर, येथे पाण्यात अडकलेल्या चार व्यक्तींना (१ महिला, १ पुरुष व दोन मुले) बाहेर काढण्यात आले. पारडी परिसरातील चौघांना,नवीननगर आणि नवकन्या नगरमधील पुरात अडकलेल्या चार लोकांची सुखरुप सुटका करण्यात आली.
हुडकेश्वर, नरसाळयाला सर्वाधिक फटका
नरसाळा, पिंपळा, हुडकेश्वर भागातून वाहणाऱ्या पोहरा नदीने बुधवारी कहर केला. हुडकेश्वर भागातील सूर्योदयनगर, नरसाळा ग्रामपंचायत जवळील चिमुरकर लेआऊट, नील विहारच्या मागच्या भाग, टेकऑफ सिटी गोन्नीसिम भाग नदीच्या पुरामुळे जलमय झाला. नदीला भिंत नसल्याने काठावरील वस्त्या जलमय होऊन येथील नागरिक घरामध्येच अडकले. पुरामुळे नरसाळा येथे निर्माणधीन एसटीपी प्लॅन्ट समोरील पुलावरून पाणी वाहत होते.
नागरिकांचा संताप
रिंगरोडवरील हिवरीनगर, पडोळे नगर आणि पिंपळा परिसरात पाणी शिरले. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात पाणी साचण्याची समस्या कायम असून वारंवार तक्रार केल्यानंतरही महापालिकेकडून परिणामकारक उपाय योजले जात नाही, असा आरोप नागरिकांनी केला. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेला पंप हाऊस आज सुरू आहे की नाही, यासंदर्भातही नागरिकांनी शंका व्यक्त केली.