नागपूर : शहर पोलीस आणि परिवहन विभाग रस्ते अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करीत असले तरी शहरात रस्ते अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या तीन महिन्यांत ३११ अपघातात तब्बल १०२ जणांचा बळी गेला असून २८४ जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरात ३०१ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता, हे विशेष.
गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाच्यावतीने रस्ते अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष मोहिम उघडण्यात आली आहे. मात्र, निरुत्साही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे यश येत नाही. रस्ते अपघातातील मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, बेदरकारपणे व भरधाव वाहन चालविणे, रस्त्यातच थांबलेली बेशिस्त वाहने आणि मागून धडक होऊन अपघात व मृत्यू वाढल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
हेही वाचा…वर्धा : भाच्यासाठी काहीही! अनिल देशमुख यांचे भाजप नेत्यांवर…
अनेकदा बेशिस्त वाहतुकही अपघाताला कारणीभूत ठरते. अनेक चालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतो, फक्त अतिआत्मविश्वासाने वाहन चालविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तसेच वाहतूक पोलीस सुसाट वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे भर देत नाहीत. शहरात उड्डाण पुल आणि रिंग रोडवर भरधाव वाहने चालविल्या जातात. त्यामुळेच रस्ते अपघात होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
वाहतूक शाखेचे अधिकारी एसी कॅबिनमधूनच रस्ते अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी सूचना देत असतात. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून कर्तव्य बजावण्यात रस दाखवत नाहीत. त्यामुळेसुद्धा शहरातील वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. शहरात रात्रीच्या सुमारास मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, पोलीस कारवाई करण्याऐवजी वसुली करण्यात मग्न असतात. रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून सर्वच स्तरावर सकारात्मक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
हेही वाचा…कंत्राटी वीज कामगारांना वयात सवलतीचे आश्वासन ठरले ‘जुमला’ !
दोन वर्षांत १०६ तरुणींचा मृत्यू
गेल्या दोन वर्षांत २६०७ रस्ते अपघातात ७१३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १०६ तरुणींचा मृत्यू झाला तर ७९६ महिला जखमी झाल्याची नोंद आहे. सर्वाधिक तरुणींचा मृत्यू दुचाकी चालविताना झालेल्या अपघातात झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये युवकांचाही मोठा टक्का आहे. गेल्या तीन महिण्यांतील अपघातात ८९ पुरुष तर १३ महिलांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा…‘हॅलो… मी उमेदवार बोलतो…’ अनपेक्षित दूरध्वनीमुळे मतदार त्रस्त
रस्ते अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखा विशेष मोहिम राबवित आहे. भरधाव वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरु आहे. रस्ते अपघात होऊ नये म्हणून पोलीस सकारात्मक प्रयत्न करीत आहेत. – शशिकांत सातव, पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा)