नागपूर : तारीख ३० ऑक्टोबर, वर्ष १९९८, म्हणजेच २७ वर्षापूर्वी एक गुन्हा घडतो. याबाबत दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबर १९९८ रोजी नागपूर पोलिसांनी तक्रार दाखल होते. मात्र या गुन्ह्यातील आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना तब्बत २५ वर्ष लागली. नागपूर पोलिसांनी १० ऑक्टोबर २०२३ रोजी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्र दाखल झाल्यावर सत्र न्यायालयात आरोपीविरोधात सुनावणी सुरू झाली आणि सत्र न्यायालयाने २७ मे २०२५ रोजी तीन आरोपींना दोषी ठरवत शिक्षा ठोठावली. अगदी चित्रपटासारखी वाटणारी ही कथा नागपूरमधील एका खटल्याची आहे. मात्र ही कथा इथेच संपत नाही, सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याच्या २७ दिवसाच्या आतच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीनपैकी एका आरोपीच्या शिक्षेला स्थगिती दिली तसेच जामीनही मंजूर केला.
नेमके प्रकरण काय आहे?
आरोपानुसार, ३० ऑक्टोबर १९९८ रोजी रात्री रामदासपेठमधील पुष्पकुंज कॉम्प्लेक्ससमोर ‘इन टाईम’ न्यूज एजन्सीचे संपादक अनुभव विनोद यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यांनी गोल्डन माईल हॉटेलवर आरोग्य परवाना नसतानाही सुरू असलेल्या कामाबाबत बातमी तयार केली होती. ती बातमी थांबवण्यासाठी त्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी बातमी न थांबवल्यामुळे त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. हल्ल्यावेळी अनुभव विनोद यांना वाचवण्यासाठी आलेले पत्रकार सुमुख मिश्रा आणि प्रकाश साखरकर यांच्यावरही तलवारी व चाकूने हल्ला करण्यात आला. सुमुख यांच्या छाती, पोट, पाय व चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. प्रकाश साखरकर यांनाही मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी व्हिडीओ कॅसेट, रक्तरंजित कपडे, शस्त्रे आणि वैद्यकीय पुरावे न्यायालयात सादर केले होते. या खटल्यात १३ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली.
एका हॉटेलवरील बातमीवरून १९९८ साली पत्रकारांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या तब्बल २७ वर्षानंतर नागपूर सत्र न्यायालयाने तीन आरोपींना दोषी ठरवत शिक्षा ठोठावली होती. मात्र, या निकालानंतर अफिखान अजातखान नावाच्या एका आरोपीने सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील दाखल केले. उच्च न्यायालयाने ही अपील स्वीकारून त्याची शिक्षा तात्पुरती स्थगित केली. तसेच, २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.आरोपी अफिखान याच्यावतीने वरिष्ठ विधिज्ञ ॲड. पी.के. सथियनाथन यांनी युक्तिवाद केला.