मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर नागपूर शुक्रवारी दुपारी (२९ ऑगस्ट २०२५) भीषण हत्याकांडाने हादरले. येथील अजनी परिसरातील गुलमोहर नगर परिसरात सोळा वर्षीय शाळकरी मुलीचा तिच्याच अल्पवयीन प्रियकराने चाकूने वार करत निर्घृण खून केला. शाळेजवळच घटना घडल्याने खळबळ उडाली. नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेबाबत आपण जाणून घेऊ या.

सेंट अँथनी स्कूलमध्ये दहावीत शिकणारी मुलगी शुक्रवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर बाहेर आली. याचवेळी इमामवाडा परिसरात राहणारा अल्पवयीन आरोपी तिच्या मागे आला. बोलण्याचे निमित्त करत अचानक त्याने चाकूने हल्ला चढवला. पाहता पाहता ही मुलगी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. शाळा परिसरात ओरड ऐकून विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक धावून आले. प्राचार्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. गंभीर जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (मेडिकल) दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिचा आधीच मृत झाल्याचे घोषित केले.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार शाळकरी मुलगी आणि आरोपी यांची ओळख तीन वर्षांपासून होती. त्यांचे संबंध प्रेमात बदलले. परंतु गेल्या काही महिन्यांपासून आरोपीशी वाद झाल्याने मुलीने बोलणे कमी केले. या दुराव्याचा राग मनात धरून आरोपीने अखेर तिचा जीव घेतल्याचा पोलिसांना संशय आहे.

घटनेनंतर आरोपी तिथून पसार झाला. अजनी पोलिस आणि गुन्हे शाखेच्या चमूने तातडीने घटनास्थली धाव घेत पाहणी केली. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याचा मागोवा घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे.
दुपारी घडलेल्या या हत्याकांडामुळे गुलमोहर नगर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांतही संतापाची भावना व्यक्त होत आहे.

चवदा वर्षांपूर्वीच्या मोनिका किरनापुरे हत्या प्रकरणाला उजाळा

नागपूरच्या नंदनवन परिसरातील केडीके कॉलेजजवळ २०११ मध्ये २३ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनी मोनिका किरनापुरे हिची हत्या झाली होती. मोनिका कॉलेजला जात असताना हा हल्ला झाला आणि दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी तिच्यावर अनेक वेळा चाकूने वार केले. हल्लेखोरांची दुसरी मुलगी लक्ष होती, परंतु मोनिकाची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले होते.