नागपूर: रविवार पासून लागलेली संततधारेची झड आणि मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने कोट्यवधींची उधळपट्टी करीत केलेल्या स्मार्ट सिटीवरचा मेकअप बुधवारी चांगलाच उतरवला. सीमेंट रस्त्यांचे सदोष बांधकाम, पाण्याच्या निचऱ्याची समस्या, अव्यवस्थित विकासकामे, सातत्याने होणारी खोदकामे व नियोजन शुन्य ढिसाळपणामुळे नागपूरकरांना एकाच पावसाने झोडपून काढत शहरातल्या १५० हून अधिक वस्त्या जलमय केल्या. पावसाने वेढलेल्या घरांमध्ये अडकलेल्या १३८ हून अधिक जणांना बोटीने सुरक्षित बाहेर काढावे लागले. शहराच्या परिघातील ४५० हून अधिक घरांमध्ये पडझडीचे अंशीक नुकसान केल्यानंतर गुरुवारी पावसाने विश्रांती दिली. सलग चार दिवसांनंत पावसाने खंड दिल्याने पूरग्रस्त भागांत पाणी ओसरले आहे.

मात्र अनेक सखल भागांमध्ये पावसानंतर जागोजागी डबक्ये आणि तळे साचले आहेत. शहराच्या सभोवताल नव्याने विकसीत होणाऱ्या नागपुरातल्या अनेक वसाहतींमध्ये इमारतीची कामे सुरू आहेत. त्या भागातही अनेक ठिकाणी खोदून ठेवलेल्या तळघरात पावसाचे पाणी कायम आहे. बुधवारी जलमय झालेल्या शहरातील अनेक भागांमध्ये गुरुवारी पाहणी केली असता बहुतांश ठिकाणी मोकळ्या भूखंडांवर पावसाच्या पाण्याने डबकी साचली आहेत. त्यात पावसाने खंड दिला असला तरी ढगाळ वातावण कायम असल्याने या डबक्यांमध्ये डासांची उत्पत्ती होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे पावसानंतर आता शहरावर आजाराचे संकट घोंघावते की काय अशी भिती व्यक्त होत आहे.

डबक्यांमुळे बेसा बेलतरोडीत चिखल

मनिष नगर टी डायव्हर्जन पॉईंट ते पिपळा, बेसा बेलतरोडीत नवे नागपूर वसले आहे. या भागांलाही बुधवारच्या पाण्याने जलमय केले होते. यात ओंकारनगर ते मनिष नगर पासून, बेसा,घोगली, बेलतरोडी, पिपळा, नरसाळा,. दिघोरी, शंकरपूर, वेळाहरी या भागांमध्ये पावसाचे पाणी ओसले असले तरी डबक्यांमुळे संपूर्ण परिसरात चिखलच चिखल झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नासधूस वस्त्यांत कुबट दुर्गंधी

सलग तीन दिवसांच्या संततधारेनंतर शहरातल्या ज्या वस्त्यांमध्ये पावसाने नासधूस केली, त्या भागांमध्ये पाण्यात घरातले साहित्य भिजल्याने कुबट दुर्गंधीचा दर्प येत आहे. बुधवारी जलमय झालेल्या वस्त्यांधील मोमीनपुरा, मुसलमानपुरा, संभाजीकसारा, भानखेडा, लाल दरवाजा, नाईक तलाव, लाल दरवाजा, कॉटन माकेंट, भानखेडा, त्रिपीटक बुध्द विहार, गड्डीगोदाम, परदेशीपूरा, धोबी मोहल्ला, गोवा कॉलनी, मद्रास कॉलनी, स्वागतनगर, अयप्पानगर, स्वामी कॉलनी, मकरधोकडा, गिट्टीखदान, याशिवाय नालंदानगर, अंगुलीमालनगर, तक्षशिलानगर, राजगृहनगर, मैत्री कॉलनी, मयुरनगर, समर्थनगर, आदर्शनगर,खोब्रागडेनगर, पंचशीलनगर, पंचकुवा, देवीनगर, यादवनगर, गोसाईपुरा, बिनाकी, संजयगांधीनगर परिसरात कमी अधिक फरकाने हीच अवस्था आहे.