नागपूर : बाजारगाव येथील सोलार एक्स्प्लोसिव्ह कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात जखमी झालेल्या दुसऱ्या कामगाराचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातात जीव गमावलेल्यांची संख्या दोन झाली आहे. दरम्यान कामगारांच्या कुटुंबीयांना कंपनी व्यवस्थापनाने दिलासा दिला आहे. प्रत्येक मृत कामगाराच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची रोख आर्थिक मदत व मृताच्या पत्नीला दरमहा १५,००० रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे.
कंपनी व्यवस्थापनाने दिलेल्या या मदतीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दुजोरा दिला. पीडित कुटुंबांना आणखी बळ देण्यासाठी, त्यांच्या पात्र सदस्यांपैकी एकाला कंपनीत कायमची नोकरी दिली जाणार असल्याचेही ते म्हणाले. नागपूर-अमरावती मार्गावरील बाजारगाव येथे ४ सप्टेंबरच्या मध्यरात्री भीषण स्फोट झाला होता. यात मयूर गणवीर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातल्या निकेश इरपाची या दुसऱ्या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सोलर एक्स्प्लोझिव्ह कंपनीत स्फोटाची घटना पहिली नाही. यापूर्वीही झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मृतांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकला होते. प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या मदतीने डीएनए नमुने गोळा करत ओळख पटवताना यंत्रणेची दमछाक झाली होती. त्यामुळे सतत घडणाऱ्या घटनांमुळे कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वी झालेल्या स्फोटातही सरकार व प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवरकठोरकारवाईची मागणी होत होती. त्यानंतरही वारंवार अशा घटना घडत आहे.
अनेकांना गंभीर दुखापती
स्फोटातील जखमींना पायाला, डोक्याला, नाकाला गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यांच्यावर शहरातील विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमींमध्ये हिमांशू पंचभाई, सिद्धार्थ डोंगरे, प्रभात मिश्रा, रवींद्र मिश्रा, रोशन फरकाडे, सचिन सरोदे, योगेंदर सिंह, सनी कुमार, सुरेश दोसेवार, अरुण कुमार, सूरज बिटने, देविचंद लोखंडे,चंद्रेश भारती, सूरज कुमार मित्तल, बादल मानकापुरे, प्रतीक तिवारी, निरज कुमार सतरांगडे, आशीष तुमडाम, सनी कुसुम, प्रेमसिंग, रोहित चुंगलकर यांचा समावेश आहे.