नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले भाजपा आमदार संदीप जोशी यांनी स्व पक्षालाच घरचा आहेर दिलेला आहे. मागील अनेक वर्षांपासून नागपूर महापालिकेमध्ये भाजप सत्तेत असतानाही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात दूषित पाणीपुरवठा होण्यावरून प्रशासनाला लक्ष केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री व नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचे आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील स्वावलंबीनगर आणि दीनदयालनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना घाणेरडे, दुर्गंधीयुक्त आणि आरोग्यास धोकादायक पाणीपुरवठा केला जात आहे.
या गंभीर समस्येकडे नागपूर महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आमदार संदीप जोशी यांनी केला. यासंदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून त्यांनी संताप व्यक्त केला.मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात ही परिस्थिती असेल, तर शहराच्या इतर भागांत काय चालू असेल याची कल्पनाच करवत नाही, अशा शब्दांत आमदार जोशी यांनी प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहे. या भागात गेल्या १५ ते २० दिवसांपासून नळांमधून दुर्गंधीयुक्त, गढूळ आणि वापरण्यायोग्य नसलेले पाणी येत असून नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात जर ही परिस्थिती असेल आणि वारंवार तक्रारी करूनही प्रशासन गप्प असेल, तर सामान्य जनतेचा आवाज कुणी ऐकायचा? असा संतप्त सवाल जोशी यांनी पत्रात उपस्थित केला आहे. नागरिक समाज माध्यमांवर सातत्याने तक्रारी करत आहेत. अनेकांनी पाण्यामुळे त्रास होत असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. तुम्ही गप्प बसलात, म्हणून आम्हीही गप्प बसू, असा गैरसमज करू नका, असा स्पष्ट इशारा त्यांनी महापालिकेला दिला आहे.
जोशी यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली नाही तर परिसरातील जनतेसह मी स्वत: गुरुवारी (७ ऑगस्ट) आयुक्तांच्या कार्यालयात धडक देईल. यावेळी नागरिकांच्या रोषाला आयुक्तांना सामोरे जावे लागेल. लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला तर ती संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची असेल.