नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘टी-१२६’ उर्फ ‘छोटा मटका’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या वाघाच्या आरोग्यात सुधारणा व्हावी याकरिता उपाययोजना करत असल्याचा दावा व्याघ्रप्रकल्प प्रशासनाने केला आहे. मात्र, या वाघासाठी उपाययोजना पुरेशा आहेत की त्याला उपचाराची आवश्यकता आहे, असा प्रश्न पर्यटक उपस्थित करत आहेत.
दोन वाघाच्या झुंजीत ‘टी-१५८’ उर्फ ‘ब्रम्हा’ या नावाने प्रसिद्ध वाघाचा मृत्यू झाला होता. तर ‘टी-१२६’ उर्फ ‘छोटा मटका’ हा वाघ गंभीर जखमी झाला होता. त्यावेळीही वनखात्याने तो नैसर्गिकरित्या ठीक होऊन म्हणून त्याच्यावर कॅमेरा ट्रॅप, एआय कॅमेरे, गस्ती पथकाच्या सहाय्याने लक्ष ठेवण्याचे काम केले. मात्र, त्याचे आरोग्य आणि विशेषकरुन पायाची जखम गंभीर असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केल्यानंतर जंगलातच त्याच्यावर उपचार करुन तात्काळ सोडण्यात आले.
त्यानंतर वाघाची स्थिती सुधारत आहे असे वाटत असतानाच पुन्हा त्याची पायाची जखम गंभीर असल्याचे व पायावर सूज असल्याचे दिसून आले. हा पाय त्याला खाली टेकवणे कठीण होत असून तीन पायावर तो चालत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ‘लोकसत्ता’ने १९ ऑगस्टला पुन्हा त्याच्या या स्थितीबाबत वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर या वाघाच्या आरोग्य स्थितीवर लक्ष असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या वाघाच्या देखरेखीसाठी त्यांनी स्वतंत्र गस्ती पथक तयार केले आहे.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दर आठवड्याला तसेच आवश्यकतेनुसार वाघाचा निरीक्षण अहवाल सादर करण्यात येणार आहे. वाघाच्या हालचालीचा जीआयएस नकाशा तयार करुन वेळोवेळी अद्ययावत करुन त्यानुसार वाघाचे सनियंत्रण करण्यात येणार आहे. कोलारा सहाय्यक वनसंरक्षकांना या सर्व कार्यवाहीसाठी ‘नोडल अधिकारी’ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मानक कार्यपद्धतीनुसार जखमी वाघाच्या हालचालीवर देखरेख व तांत्रिक मार्गदर्शनासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. यात वनविभाग, पशुवैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था, मानद वन्यजीव रक्षक आणि स्थानिक प्रतिनिधींचा समावेश आहे. ही समिती या वाघाच्या उपचार किंवा अन्य उपाययोजनांबाबत ठोस शिफारशी करेल. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मानक कार्यपद्धतीनुसार जखमी वाघाबाबत पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे, ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ल यांनी सांगितले.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील या वाघाचे आरोग्य आणखी खालावत आहे. त्यामुळे त्याची काळजी घेण्यात यावी आणि आधी त्याच्यावर उपचार करण्यात यावे. उपचारानंतर पुन्हा त्याला त्याच्या मुळ अधिवासात म्हणजेच जंगलात सोडावे. -शिवानी सावदेकर, पर्यटक, नागपूर</strong>