राज्यातील पहिल्या यंत्रमानव शस्त्रक्रिया केंद्राचा (रोबोटिक सर्जरी केंद्र) प्रस्ताव वाढीव निधीअभावी हाफकिनकडे रखडला होता. तीन महिन्यांपूर्वी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खनिकर्म महामंडळाकडून ३.८९ कोटींचा अतिरिक्त निधी मिळवून दिला. परंतु, निविदा प्रक्रिया झालेली असतानाही हाफकिनकडून यंत्रमानवाचा खरेदी आदेश निघत नसल्याने प्रकल्प रखडलेलाच आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ‘यंत्रमानव शस्त्रक्रिया केंद्र’ स्थापण्याचा निर्णय झाला. त्यावेळचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी पुढाकार घेतला होता. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खनिकर्म निधीतून १६.८० कोटी रुपये दिले गेले. ही रक्कम यंत्र खरेदीसाठी ‘हाफकिन’कडे तेव्हाच वर्ग झाली. मात्र विविध कारणाने विलंब झाला. प्रथम निविदेत दोनच कंत्राटदार सहभागी झाल्याने प्रक्रिया रद्द झाली.

…त्यामुळे तातडीने प्रक्रिया होऊन खरेदी आदेश मिळणे अपेक्षित होते –

या केंद्राला विलंब होत असल्याने उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या सुनावणीत तातडीने निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले. त्यानुसार हाफकिनने निविदा प्रक्रियाही राबवली. त्यात तीनपैकी एका कंत्राटदाराने २०.५० कोटीत हे यंत्र पुरवण्याची तयारी दर्शवली. दरम्यान, अतिरिक्त ३.८९ कोटी मिळणार कुठून हा प्रश्न निर्माण झाला. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाने खनिकर्म महामंडळाकडून हा निधी मिळवून दिला. तीन महिन्यांपूर्वी तो मेडिकलकडून हाफकिनकडे वर्गही झाला. त्यामुळे तातडीने प्रक्रिया होऊन खरेदी आदेश मिळणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही काहीच हालचाल झालेली नाही.

पूर्वी निश्चित केलेल्या किमतीहून जास्त खर्च लागत आहे –

या प्रकल्पाला पूर्वी निश्चित केलेल्या किमतीहून जास्त खर्च लागत आहे. प्रकल्पासाठी वाढीव निधी मिळाला असला तरी सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी तो सचिवांकडे पाठवला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल अपेक्षा आहे.”-सुनील पुंडगे, व्यवस्थापक उपकरणे, हाफकिन, मुंबई.