नागपूर : वाहतूक सिग्नलवर थांबण्यासाठी ‘स्टॉपलाईन’समोर गाडी नेऊन वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गेल्या सव्वा दोन वर्षांत जवळपास ३५ हजारांपेक्षा जास्त वाहनांवर ‘स्टॉपलाईन’ ओलांडल्याची कारवाई करण्यात आली. नियमांचे नकळत उल्लंघन केल्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसत आहे.
सिग्नलवर लाल दिवा लागल्यानंतर वाहन ‘स्टॉपलाईन’पूर्वी थांबविण्याचा वाहतूक नियम आहे. अनेक जण नियमांनुसार सिग्नलवर वाहन थांबवतात. परंतु, काही जण सिग्नल सुटल्यावर लवकर निघता यावे म्हणून वाहन ‘स्टॉपलाईन’ ओलांडतात. केवळ अर्धा ते एक फुट अंतर ओलांडल्यामुळे सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ‘स्टॉपलाईन’ ओलांडल्याची बाब हेरल्या जाते. काही दिवसांतच घरी किंवा भ्रमणध्वनीवर वाहतूक शाखेचे ई चालान येते. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडतो. नियमानुसार सिग्नलवर थांबल्यानंतरही चालान आल्यामुळे वाहतूक पोलिसांशी वादही घालतात. मात्र, ‘स्टॉपलाईन’ओलांडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाहतूक पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
सिग्नलवर वाहनचालक पुढे जाण्याच्या घाईत वाहन चक्क ‘स्टॉपलाईन’वर थांबवतात. हिच चूक सीसीटीव्हीच्या माध्यमातून हेरुन दंडात्मक कारवाई करण्यात येते. गेल्या वर्ष २०२३ मध्ये ११ हजार ६२९ वाहनचालकांनी ‘स्टॉपलाईन’ ओलांडल्यामुळे कारवाई करण्यात आली. २०२४ मध्ये यामध्ये वाढ होऊन १९ हजार ४२५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावर्षी जानेवारी ते एप्रिल ४ हजार ६२७ वाहनचालकांनी स्टॉपलाईन ओलांडल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहिम सुरु केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.
… अन् ते पाच सेंकद
सिग्नलवर उभे असलेले वाहनचालक हिरवा दिवा लागण्यास शेवटचे पाच ते सात सेकंद बाकी असताना वाहन पळविण्याची घाई करतात. कर्णकर्कश हॉर्न वाजवायला सुरूवात करतात. हिरवा दिवा होण्यास पाच सेकंद बाकी असतानाच अनेक वाहनचालक थेट वाहने पळवायला लागतात. याच पाच सेकंदामध्ये अनेकदा वाहनाला ‘स्टॉपलाईन’ ओलांडल्याचे चालान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. वाहतूक नियम पाळून वाहनचालकांनी सहकार्य करावे – माधुरी बाविस्कर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.