नागपूर: भारत-पाकिस्तानमध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना स्वसंरक्षणासाठी सराव करण्याचे निर्देश सोमवारी दिले. ७ मे रोजी हा सराव होणार असून त्यामध्ये शत्रूने हल्ला केल्यास सुरक्षा यंत्रणा तसेच नागरिकांची संरक्षणसिद्धता वाढविण्याचा उद्देश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात नागपुरात आणि नजीकच्या शहरात कुठल्या भागात स्वसंरक्षणाचा सराव केला जाणार आहे ही माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
पहलगाम हल्लेखोर तसेच त्यांच्या पाठीराख्यांना जगाच्या अंतापर्यंत शोधून शासन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिल्यानंतर आता पाकिस्तानचे पाणी अडविण्यास सुरुवात झाली असताना तेथील नेते थेट अण्वस्त्रांची धमकी देत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने ७ मे रोजी राज्यांनी ‘मॉक ड्रिल’ (स्वसंरक्षण सराव) करावे, असे निर्देश दिले. देशभरातील एकूण २४४ जिल्ह्यांमध्ये हा युद्धसराव केला जाणार आहे. यामध्ये हवाई हल्ला झाल्यास इशारा देणाऱ्या भोंग्यांची चाचणी तसेच अशा स्थितीत नागरिकांनी स्वत:चा बचाव कसा करावा, याबाबत प्रशिक्षण दिले जाण्याची शक्यता आहे.
याशिवाय ‘क्रॅश ब्लॅकआउट’ (मोठ्या प्रदेशात एकाच वेळी अंधार करणे), महत्त्वाच्या आस्थापनांच्या संरक्षणासाठी ‘कॅमोफ्लॉज’, तातडीने स्थलांतर करावे लागल्यास त्याची तयारी आणि सराव आदीचा समावेश बुधवारच्या रंगीत तालमीममध्ये केला जाईल, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. सध्याच्या भूराजकीय वातावरणात नव्या धमक्या आणि आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे आपली नागरी संरक्षण सिद्धता सर्वोच्च पातळीवर असणे आवश्यक असल्याचे गृह मंत्रालयातील अग्निशमन, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक विभागाचे महासंचालनालयाने राज्यांना दिलेल्या सूचनेत म्हटले आहे. निश्चित करण्यात आलेल्या २४४ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, अन्य जिल्हास्तरीय प्राधिकरणे, होम गार्ड, एनसीसी, एनएसएस, महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी या सरावामध्ये सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन गृह मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
उपराजधानीत काय स्थिती
स्वसंरक्षण सरावा संदर्भात एनसीसी आणि राष्ट्रीय सेवा योजना या संस्थाच्या स्वयंसेवकांना सहभागी केले जाणार असल्याचे माहिती होती. स्वसंरक्षण कसे करावे हा या स्वयंसेवकांच्या अभ्यासाचा एक भाग असतो. त्यामुळे हे स्वयंसेवक जनतेला स्वसंरक्षण कसे करायचे याचे धडे देणार होते. परंतु उद्या बुधवारी देशभर विविध शहरात स्वसंरक्षणाचा सराव केला जाणार असला तरी तूर्तास नागपूर येथील एनसीसी आणि एनएसएस या दोन्ही संस्थांना कुठल्याही सूचना देण्यात आलेल्या नसल्याची माहिती आहे.