‘एज्युकेशन हब’ म्हणून नागपूरची ओळख होत असली तरी येथील शैक्षणिक संस्थांमधील अंतर्गत राजकारण आणि विशिष्ट विचारधारेच्या प्रचारासाठी संस्थांचा होणारा वापर याचा परिणाम केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’मध्ये (एनआयआरएफ) दिसून आला. शतकोत्तर वर्षाकडे वाटचाल सुरू असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह देशातील नामवंत संस्थेचा दर्जा लाभलेल्या व्हीएनआयटी, आयआयएम नागपूर आणि एलआयटी राष्ट्रीय शैक्षणिक संस्था क्रमवारीमध्ये पिछाडल्या आहे. मागील वर्षी ३० व्या स्थानावरील व्हीएनआयटी यंदा ३२ व्या तर आयआयएम नागपूर ४० वरून ४३व्या स्थानावर पोहचले.

दरवर्षी देशभरातील विद्यापीठ, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी, वैद्यकीय, औषधनिर्माण आणि विधि शाखेतील महाविद्यालये आणि विद्यापीठांचे मानांकन जाहीर करण्यात येते. विद्यापीठ आणि महाविद्यालयांची गुणवत्ता तपासून हे मानांकन ठरवण्यात येते. यंदाच्या मानांकनामध्ये व्हीएनआयटीसह आयआयएम, नागपूर विद्यापीठ, शासकीय विज्ञान संस्था अशा अनेक शैक्षणिक संस्था मागे पडल्या आहेत.

दुसरीकडे शहरातील शासकीय दंत महाविद्यालयाने दंत श्रेणीत ९वा क्रमांक पटकावला आहे –

शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या नागपूर विद्यापीठाची राष्ट्रीय क्रमवारीमध्ये निराशाजनक कामगिरी आहे. मागील वर्षीही विद्यापीठाला पहिल्या १५० मध्ये स्थान मिळवता आले नव्हते. गेल्यावर्षीप्रमाणे विद्यापीठाला १५०-२०० जणांच्या गटात स्थान देण्यात आले आहे. विद्यापीठाला कोणतेही मानांकन मिळालेले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, यंदा विद्यापीठाच्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीलाही क्रमवारीत स्थान मिळवता आलेले नाही. गेल्यावर्षी एलआयटीला अभियांत्रिकी श्रेणीत १३६ वे स्थान मिळाले होते. यावर्षी विद्यापीठाच्या औषधनिर्माणशास्त्र या एकमेव विभागाला क्रमवारीत ४२वे स्थान मिळाले आहे. कामठी येथील किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसीने ५३ वा क्रमांक पटकावला आहे. गेल्यावर्षी ही संस्था ४६व्या क्रमांकावर होती. याशिवाय मागील वर्षी महाविद्यालयीन श्रेणीत ६१ व्या क्रमांकावर असलेल्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि ८८ व्या क्रमांकावर असलेल्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्सला यंदा क्रमवारीत स्थान मिळाले नाही. दुसरीकडे शहरातील शासकीय दंत महाविद्यालयाने दंत श्रेणीत ९वा क्रमांक पटकावला आहे.

अभियांत्रिकी संस्थाही त्याच मार्गाने –

अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या श्रेणीत व्हीएनआयटी ३२ व्या स्थानावर आहे. मागील वर्षी ३० व्या तर त्याआधी २७ व्या क्रमांकावर होती. त्याचप्रमाणे यावर्षी श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय१४६व्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी या संस्थेला ११९ वा क्रमांक मिळाला होता. यावर्षी शहरातील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय १६३ व्या क्रमांकावर आहे, जे मागील वर्षी १३० होते. याशिवाय यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय देशात १८५ व्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी ही संस्था १४९व्या क्रमांकावर होती.