नागपूर: अपघात, कर्करोग, हृदयरोग, किडनीचे आजार झालेल्या रुग्णाला औषध उपचार करण्यासाठी मोठा खर्च परिवाराला सोसावा लागतो. त्यामुळे अनेकांना आर्थिक भुर्दंडही सहन होत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने वैद्यकीय सहायता निधी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून नुकतेच दोन मुलींना मदतही करण्यात आली. काय आहे ही योजना पहा.

नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या माता मंजुळाबाई विद्यार्थी वैद्यकीय सहायता निधीतून दोन विद्यार्थिनींना तब्बल एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. दोन विद्यार्थिनींना १ लाख ८ हजार ९१७ रुपयांचा वैद्यकीय सहायता निधीचा धनादेश प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार व कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्या हस्ते शुक्रवारी देण्यात आला. यावेळी विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ. विजय खंडाळ उपस्थित होते.

विद्यापीठाच्या सर्व संलग्नित, संचालित महाविद्यालय तसेच शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाचा अपघात अथवा मोठ्या आजारात वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या माता मंजुळाबाई विद्यार्थी वैद्यकीय सहायता निधीचा ४२ हजार २१४ रुपयांचा धनादेश गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर येथील शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालयातील बी.एस्सी.ची विद्यार्थिनी रूषाली अनिल खोब्रागडे हिला शस्त्रक्रियेसाठी देण्यात आला. त्याचप्रमाणे कामठी रोड येथील डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस कला व विज्ञान महाविद्यालयाची बी.ए.ची विद्यार्थिनी आचल किशोर सलामे हिला उपचाराकरिता ६६ हजार ७०३ रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला. विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या माता मंजुळाबाई विद्यार्थी वैद्यकीय सहायता निधी व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून निधीची व्यवस्था, प्रशासन, देखरेख व वितरण करण्यात येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध प्रकारच्या आजारावर उपचारासाठी निधी

विद्यार्थी वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत अपघात, जळणे, क्षयरोग, कोणत्याही प्रकारचा कर्करोग /ट्युमर, हृदयरोग, किडनीचे आजार, ज्या आजारांमध्ये सात दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस रुग्णालयात भरती करावयाचे असेल असे सर्व संसर्गजन्य रोग, कोणत्या ही प्रकारचे आंतरिक रक्तस्त्राव, अपंगत्व, वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेले जीवनाशी निगडित असलेले इतर गंभीर स्वरूपाचे आजार यांचा यामध्ये समावेश आहे. विद्यार्थ्यांनी माता मंजुळाबाई विद्यार्थी वैद्यकीय सहायता निधी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. विजय खंडाळ यांनी केले आहे.