नागपूर: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठामध्ये भाषण करताना प्रभू श्रीराम हे ‘पौराणिक पात्र’ आहेत, असे संबोधित केले. यावर सर्वच स्तरातून विरोध होत असून विश्व हिंदू परिषदेनेही राहूल गांधींच्या या वक्तव्याचा तिव्र शब्दात निषेध केला आहे. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी या वक्तव्यासाठी राहूल गांधी यांनी देशातील सर्व हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परांडे पुढे म्हणाले की, जाणिवपूर्व हिंदू समाजाचे अपमान करण्याचे काम सुरू आहे. राहूल गांधी यांनी हिंदू समाजाची माफी मागावी. जे भगवान श्रीरामांचा विरोध करतात त्यांचा राजकीय शेवट निश्चित आहे. राहूल गांधींचा उद्देश केवळ सत्ता मिळवणे आहे. त्यामुळे अशा हिंदू विरोधी लोकांना सत्तेपासून कायम दूर ठेवणे आवश्यक आहे. देशात आणि प्रत्येक राज्यांत हिंदू विचारांना पोषक सरकारच सत्तेत राहायला हवी. या देशाची संस्कृती ही हिंदू असून आमच्या दैवतांचा असा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही, अशा शब्दात टीका केली.
तर अशांची समाधी येथेच बांधू
देशात धार्मिक हिंसा वाढत आहेत. पहलगाममध्ये धर्म विचारून निर्दाेष लोकांची हत्त्या करण्यात आली. दहशतवाद्यांना धर्म नसतो असे काही लोक म्हणतात. परंतु, अशा घटना यावर विचार करायला लावतात. नागपूरमध्ये झालेला हिंसाचार हा हिंदू समाजावरील आक्रमनाचा भाग होता, असा आरोपही त्यांनी केला. मुस्लीम समाजातील एक वर्ग जर हिंदू समाजामध्ये भीती घालण्याचा विचार करत असेल तर अशांची समाधी येथेच बांधली जाईल. हिंदू समाजानेही या गोष्टींचा गंभीरपणे विचार करून स्वत:चे रक्षण कसे करता येईल याचा विचार करायला हवा, असे आवाहन परांडे यांनी केले.
हिंदू मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करा
हिंदू मंदिरांची सरकारी नियंत्रणातून मुक्ती करावी हे अभियान विश्व हिंदू परिषदेने हातात घेतले आहे. याचाच भाग म्हणून विजयवाडा येथे जनजागृती अधिवेशन घेण्यात आले. तीन लाख लोक उपस्थित होते. यावेळी सरकारी नियंत्रणात असलेल्या हिंदू मंदिरांना मुक्त करण्यावर निर्णय घेण्यात आला. यासाठी कायदेशीर लढाही दिला जाणार आहे. विश्व हिंदू परिषदेचे अनेक पदाधिकारी आणि कायदेतज्ञांनी मिळून हिंदू मंदिरांचे नियंत्रण मिळवण्यासाठी तयारी केली जात आहे. विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि आमदारांच्या भेटी घेऊन मंदिर मुक्तीचा प्रस्ताव दिला जाणार आहे. मागील महिन्यापर्यंत लोकसभेच्या सदस्यांनाही याची भेट घेऊन माहिती देण्यात आली. विजयवाड्याप्रमाणे मोठ्या सभा देशातील अन्य भागातही घेतल्या जाणार आहेत. समाजातील प्रतिष्ठीत वर्गाला या अभिनाशी जोडले जाणार आहे.
प्रत्येक हिंदूंनी दोन मुले जन्माला घालावी
हिंदू समाजाची लोकसंख्या कमी होत आहे. कमी होत चाललेला जन्मदर याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूंनी दोन मुले तरी जन्माला घालावी यासाठी देशभर जनजागरण केले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या प्रयागराज येथील कुंभ मेळाव्यामध्ये अनेक संतांसोबत या विषयावर चर्चा झाली. यावेळी हिंदूचा जन्मदर वाढवण्यासाठी सर्व संतही देशभर जनजागृती करणार असल्याची माहिती परांडे यांनी दिली.