नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो सेवेमध्ये प्रामाणिकतेचा आणखी एक प्रसंग नुकताच घडला. प्रजापती नगर मेट्रो स्टेशनवर आलेल्या एका ट्रेनमध्ये श्रीमती बिना टेंभरे या प्रवासी महिलेची पर्स सापडली. त्या पर्समध्ये सुमारे १ लाख किंमतीचे सोन्याचे दागिने आणि ४,००० रोख रक्कम होती. प्रवासादरम्यान त्या पर्स मेट्रोमध्येच विसरून स्टेशनवर उतरल्या होत्या.

ही पर्स सापडल्यानंतर, स्टेशनवरील जागरूक कर्मचाऱ्यांनी ती तात्काळ ताब्यात घेतली आणि नियमानुसार ‘लॉस्ट अँड फाउंड’ विभागाकडे सुपूर्त केली. पर्समधील कागदांच्या आधारे संबंधित प्रवाश्याचा संपर्क साधला, पर्स घ्यायला आलेल्या  महिलेची ओळख पटावी म्हणून सर्व आवश्यक कागदपत्रांची पुनर्तपासणी करण्यात आली. खात्री झाल्यानंतर, ही मौल्यवान पर्स श्रीमती टेंभरे यांच्याकडे सुरक्षितपणे परत करण्यात आली.

आपली हरवलेली पर्स सुरक्षितपणे परत मिळाल्याने श्रीमती टेंभरे भावूक झाल्या आणि मेट्रो प्रशासनाचे तसेच कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले. त्यांनी सांगितले, “मी पूर्णपणे हादरले होते. इतक्या मौल्यवान वस्तू हरवल्याचे दु:ख असतानाच, मेट्रो कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि प्रामाणिकता पाहून मला पुन्हा एकदा मानवतेवर विश्वास बसला आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रसंग नागपूर मेट्रोतील कर्मचाऱ्यांची सचोटी, दक्षता आणि सेवाभाव अधोरेखित करणारा आहे. प्रवाशांच्या केवळ सुरक्षित प्रवासासाठी नव्हे, तर त्यांच्या वस्तूंच्या सुरक्षेसाठीही मेट्रो प्रशासन कटीबद्ध आहे, हे या उदाहरणातून स्पष्ट होते.